मुंबई, 14 मार्च : कोरोनामुळे जगभरातील अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. याचा फटका क्रीडा विश्वालाही बसला आहे. कोरोनामुळे भारतातील सर्वात मोठी क्रिकेट लीग इंडियन प्रीमिअर लीग पुढे ढकलण्यात आली आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम 29 मार्चपासून सुरू होणार होता, मात्र आता ही तारिख 15 एप्रिल करण्यात आली आहे. बीसीसाआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सचिव जय शाह यांच्यासोबत चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. मात्र कोरोनाचा धोका वाढल्यास काय होणार? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान कोरोनाच धोका कायम राहिल्यास आयपीएल रद्द होऊ शकते, असे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
स्पोर्ट्सस्टार या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएलचा तेरावा हंगामाची सुरुवात 20 एप्रिलपर्यंत न झाल्यास हा हंगामचं रद्द केला जाऊ शकतो. याबाबत 10 एप्रिलनंतर निर्णय घेण्यात येईल. 20 एप्रिलपर्यंत या हंगामाला सुरुवात न झाल्यास, हा हंगाम रद्द केला जाऊ शकतो. कारण मेनंतर आशियाई कप आणि टी-20 वर्ल्ड कपची तयारी संघाना करावी लागणार आहे.
वाचा-BREAKING: कोरोनामुळे IPL लांबणीवर, 29 मार्चऐवजी 15 एप्रिलपासून सुरू होणार
आयपीएल पुढे ढकलल्यास काय होणार?
आयपीएलचा हंगाम पुढे ढकलण्यात आल्यामुळे या स्पर्धेसाठी दिवसांचा कालावधी कमी झाला आहे. 21 एप्रिल ते 31 मे दरम्यानचा कालावधी हा आयपीएलसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या दरम्यान 60 सामन्यांचे आयोजन बीसीसीआयला करायचे आहे. त्यामुळे 20 एप्रिलनंतर आयपीएल पुढे गेल्यास हा हंगाम रद्द होऊ शकतो.
वाचा-गांगुलीने तयार केला IPLचा ‘प्लॅन बी’, नव्या वेळापत्रकाप्रमाणे होऊ शकतात सामने
गांगुलीचा प्लॅन बी
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या तेराव्या हंगामात एकूण 8 संघ आहेत. त्यामुळं 8 संघाचे 4 गट केले जाऊ शकतात. त्यानंतर या गटांमध्ये प्रत्येकी 6 सामने होतील. म्हणजे एकूण 24 गट सामने होतील. त्यानंतर 2 संघांमध्ये उपांत्य पूर्व, एक अंतिम सामना आणि एक सामना चौथ्या क्रमांकासाठी होईल. म्हणजे एकूण 28 सामने होतील, हे सामने 24 मेपर्यंत आयोजित केले जाऊ शकतात. त्याचबरोबर, खेळाडूंचे प्रवास थांबवण्यासाठी प्रत्येक संघाच्या होमग्राउंडवर सामने आयोजित केले जाणार नाहीत. तसेच, याआधी केवळ रविवारी दोन सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. आता सामने पुढे ढकलल्यामुळे शनिवारीही दोन सामन्यांचे आयोजन केले जाऊ शकते.
आयपीएल रद्द करणे सोयीचे
दुसरीकडे, आयपीएल फ्रँचायझी किंग्ज इलेव्हन पंजाबचे सह-मालक नेस वाडिया यांनी बीसीसीआयने Covid-19च्या दृष्टीने 15 एप्रिलपर्यंत आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सांगितले की, परिस्थिती दोन-तीन आठवड्यात सुधारली नाही तर आय़पीेएल रद्द करावी. तसेच, आयपीएलच्या आयोजनासाठी परिस्थितीत सुधारणा झाली पाहिजे आणि यासाठी कुणाचेही आयुष्य धोक्यात टाकू नये. आयपीएलमुळे कोणाचेही आयुष्य धोक्यात येऊ नये, असे वाडिया यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.