मुंबई, 31 ऑक्टोबर : शुक्रवारी IPL 2020 क्रिकेट स्पर्धेमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (Rajasthan Royals) सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत किंग्ज इलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab) 4 बाद 185 धावांपर्यंत मजल मारली. ख्रिस गेलच्या (Chris Gayle) आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पंजाबने हे धावसंख्या उभारली. शेख झाएद स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थानचा गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या अखेरच्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर त्याने वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार गेलला क्लिन बोल्ड केलं. गेल 99 धावांवर बाद होऊन तंबूत परतल्यानं त्याचं टी-20 क्रिकेटमधलं 23 वं शतक हुकलं. मात्र या डाव्याखुऱ्या फलंदाजाने 63 चेंडूंत 99 धावांची खेळी केली. त्याने या धावसंख्येत 6 चौकार आणि 8 षटकारांची आतषबाजी केली.
गेलने ही इनिंग खेळताना टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक 1000 षटकार मारणारा पहिला खेळाडू असा विक्रमही त्याने आपल्या नावे केला आहे. आपल्या तुफान बॅटिंगसह गेलने आधी पंजाबचा कर्णधार के. एल. राहुलबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली. त्यानंतर निकोलस पूरनबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली.
(हे वाचा-IPL 2020 : Lockdown मध्ये घराच्या गच्चीवर पत्नीने करून घेतला होता असा सराव VIDEO)
त्यांच्या ह्या विक्रमाबद्दलच बोलायचं तर, तो या यादीतील इतर खेळाडूंपेक्षा अनेक मैल पुढे आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत गेलनंतर दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचाच त्याचा साथीदार खेळाडू पोलार्ड आहे ज्याने एकूण 690 षटकार मारले आहेत. त्यानंतर नाव येतं ते ब्रँडन मॅकल्लमचं ज्याने 485 षटकार मारले आहेत. या यादीतील भारतीय खेळाडूचं नाव आहे रोहित शर्मा. ज्याने एकूण 376 षटकार आपल्या नावे केले आहेत.
त्याच्या या तुफान खेळीनंतर सामन्याच्या मध्यंतरात गेल म्हणाला, 'ही खेळी चांगली झाली. मला वाटतं 180 ही चांगली धावसंख्या आहे. विकेट चांगली आहे आणि रात्री ती आणखी चांगली होईल. 99 धावांवर बाद होणं दुर्दैवी आहे'. त्याला बाद करणाऱ्या जोफ्रा आर्चरच्या चेंडूबद्दल तो म्हणाला, 'त्याने चांगला चेंडू टाकला होता. खेळात असं घडतंच.'
(हे वाचा-IPL 2020 : रोहित शर्माची 9 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी खरी ठरली)
गेलला आपल्या नव्या विक्रमाची माहिती नव्हती असं दिसलं. तो म्हणाला, "ओह 1000 मॅक्सिमम्स? अजून एक विक्रम. वयाच्या 41 व्या वर्षी चांगले फटके लागत आहेत. त्याबद्दल आभार मानायला हवेत. ज्यांची माझ्याकडून शतकाची अपेक्षा होती त्यांनी मला माफ करावं मी आज शतक करू शकलो नाही, पण माझ्या मनात ते एक शतकच आहे"