Home /News /sport /

IPL 2020: 'कॅप्टन कूल'ला जेव्हा राग येतो...! MS धोनीचा 5 वेळा झालाय पंचांशी वाद

IPL 2020: 'कॅप्टन कूल'ला जेव्हा राग येतो...! MS धोनीचा 5 वेळा झालाय पंचांशी वाद

जगभरात कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे, पण आयपीएल टी-20 क्रिकेट खेळतो आहे. आयपीएल टी-20 क्रिकेट 2020 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात पंचांचा निर्णय पटला नसल्याने धोनीचा वाद झाला.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) हा त्याच्या मैदानावरील अत्यंत शांत वर्तनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याला जगभरात कॅप्टन कूल म्हणून ओळखलं जातं. आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे, पण आयपीएल टी-20 क्रिकेट खेळतो आहे. आयपीएल टी-20 क्रिकेट 2020 स्पर्धेमधील चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध  (Chennai Super Kings) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) सामन्यात वाईड चेंडू देणारे मैदानावरचे पंच (Umpires) पॉल रेफेल (Paul Reiffel) यांच्याकडे धोनी एकटक बघत होता. त्याला तो निर्णय पटला नसल्याने तो असं वागला, पण त्याच्या या वागण्यामुळे धोनीवर टीका होत आहे. थंड डोकं ठेवणाऱ्या धोनीने या आधीही पाच वेळा मैदानातल्या पंचांशी वाद घातला होता. IPL 2020 CSK vs RR याच आयपीलएमधील राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (Rajasthan Royals) सामन्यात राजस्थान पहिल्यांदा फलंदाजी करत होतं. 18 व्या षटकात राजस्थानच्या टॉम करनचा धोनीनी यष्ट्यांमागे कॅच घेतला आणि त्याला पंचांनी आउट दिलं. टीव्हीवरच्या रिप्लेमध्ये चेंडू बॅटला लागलाच नव्हता असं दिसलं. त्याचबरोबर मैदानात असलेल्या स्क्रीनवर हेही दाखवण्यात आलं की धोनीनी झेल घेण्याआधी चेंडू जमिनीवर टेकला होता. राजस्थानचे रिव्ह्यू बाकी नव्हते, त्यामुळे करन पंचांकडे दाद मागू शकत नव्हता. तरीही मैदानातल्या पंचांनी टीव्ही अंपायरकडे रिव्ह्यू मागण्याचा निर्णय घेतला. टीव्ही अंपायरने करन नाबाद असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे राजस्थानचा रिव्ह्यू बाकी नसताना त्यांनी टीव्ही अंपायरकडे रिव्ह्यू का मागितला असं विचारत धोनीनी मैदानातल्या पंचांशी वाद घातला होता. IPL 2019 CSK vs RR चेन्नई धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होती आणि सामना शेवटाकडे चालला होता. चेन्नईला विजयासाठी तीन चेंडूंत 8 धावा हव्या होत्या. राजस्थानच्या बेन स्टोक्सने (Ben Stokes) चेन्नईच्या मिचेल सँटनरला (Mitchell Santner) फुल टॉस चेंडू टाकला तो सँटनरच्या कंबरेवर होता असं वाटलं. मैदानावरचे लेग अंपायर ब्रुस ऑक्सनफोर्ड (Bruce Oxenford) नो बॉल देतील अशी चेन्नईची अपेक्षा होती पण तसं न झाल्याने धोनी मैदानात आला आणि त्यानी पंचांशी वाद घातला. 2015 ODI India vs South Africa, Indore पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 असा पिछाडीवर होता, त्यामुळे त्यांच्यासाठी हा ‘करो या मरो’ सामना होता. या सामन्यापूर्वी भारतीय संघानी पंच विनीत कुलकर्णींच्या (Vineet Kulkarni) अंपायरिंगबद्दल तक्रार केली होती. चौथ्या एकदिवसीय सामन्यात हरभजनसिंगच्या गोलंदाजीवर फरहान बेहारदीन (Farhaan Behardien) यष्टिमागे झेलबाद झाला होता. हरभजननी हलक्या आवाजात तर धोनीने जोरदार अपील केलं होतं. पंच कुलकर्णींनी फलंदाज बाद दिला होता. अनेकांचं असं मत आहे की भारतीय संघाने केलेल्या तक्रारीमुळे पंच विनीत कुलकर्णींनी दबावाखाली या फलंदाजाला आउट दिलं होतं. 2013 ODI India vs Australia ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू होती. रवीचंद्रन अश्विनच्या 41 व्या षटकात पंच शमसुद्दीन (Shamsuddin) यांनी शेवटचा चेंडू ओव्हर वाईड दिला. धोनीला पंचांचा निर्णय पटला नाही. असं म्हणतात की तेव्हा भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या धोनीच्या नाराजीमुळे पंचांनी निर्णय बदलला होता. 2012 ODI India vs Australia, CB series सुरेश रैना (Suresh Raina) ऑस्ट्रेलियाच्या मायकेल हसीला (Michael Hussey) गोलंदाजी करत होता. धोनीने हसीला यष्टिचित केल्याचं अपील केलं. मैदानातील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली त्यांनी हसीला बाद दिलं. पण खरं तर धोनीनी यष्ट्यांना चेंडू लावण्याआधीच हसी क्रिझमध्ये पोहोचला होता. मैदानावरील पंच बिली बॉवडेन (Billy Bowden) यांना लक्षात आलं की तिसऱ्या पंचांनी चुकीचा निर्णय दिला आहे, त्यामुळे त्यांनी हसीला पुन्हा मैदानात खेळायला बोलवलं. त्यामुळे धोनी आणि बॉवडेन यांच्यात वाद झाला होता.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: IPL 2020

    पुढील बातम्या