नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : IPL 2020 चा हंगाम सुरू होण्याच्या आधीपासूनच Coronavirus चं संकट गहिरं झालं आहे. याचा पहिला फटका बसला आहे चेन्नईच्या संघाला. Chennai Super kings संघातल्या 11 जणांना (CSK coronavirus) कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्जचा (CSK Coronavirus) संपूर्ण संघ क्वारंटाईन झाला आहे.
चेन्नईचा संघ 21 ऑगस्टला दुबईला पोहोचला. सात दिवसांच्या क्वारंटाईननंतर ते सरावाला सुरुवात करणार होते. पण त्यापूर्वीच Covid ची लागण झाल्याचं समजल्याने आता विलगीकरणाचा कालावधी वाढला आहे.त्यांचा शुक्रवारपासून सराव सुरू होणार होता. पण त्यापूर्वीच एका टीम मेंबरला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर झालेल्या चाचणीत 11 जण Covid-19 पॉझिटिव्ह सापडले. त्यामुळे संपूर्ण संघ क्वारंटाईन झाला आहे.
चेन्नईच्या संघातल्या कोविड संसर्गाबद्दल अद्याप संघ व्यवस्थापक किंवा कोणीही अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. या बातमीला पुष्टी मिळालेली नाही. पण काही माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार सपोर्ट स्टाफपैकी 10 जण आणि एक भारतीय खेळाडू यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
चेन्नईचा संपूर्ण संघ एकाच हॉटेलमध्ये उतरला आहे. आणखी एक आठवडा तरी आता त्यांना हॉटेलबाहेर पडता येणार नाही.
BCCI ने घालून दिलेल्या नियमानुसार, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी किमान तीन वेळा खेळाडूंची कोविड चाचणी व्हायला हवी. त्याप्रमाणे चेन्नईची टीम दुबईला पोहोचल्यानंतर त्यांची चाचणी झाली. त्यात कोरोनाव्हायरसचा संसर्ग झाल्याचं उघड झालं आहे. आणखी एका चाचणीचा निकाल अद्याप आलेला नाही. तो उद्यापर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.