दुबई, 31 ऑगस्ट : आयपीएल 2020 (IPL 2020) ही स्पर्धा युएइमध्ये आयोजित करण्यात आली आहे. 19 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होईल. मात्र या स्पर्धेवरील संकट कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. याआधी चेन्नई सुपरकिंग्ज संघातील दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर आणखी टीममधील सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
खेळाडू आणि स्टाफ मेंबरना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता टीव्ही टीममधील एका सदस्याला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. प्रोडक्शनची पहिली बॅच आज युएइला रवाना होणार होती. मात्र टीममधील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांचे उड्डाण थांबविण्यात आले आहे.
कोरोनामुळे बीसीसीआयने आयपीएलचा 13 वा हंगाम युएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला, मात्र चेन्नई सुपर किंग्जच्या दोन खेळाडूंसह 13 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयला धक्का बसला. सध्या चेन्नईच्या संपूर्ण संघाला क्वारंटाइन करण्यात आले आहे. दुसरीकडे युएइ जाण्याआधी सर्वांची तीन वेळा कोरोना चाचणी करण्यात आली होती.
वाचा-धोनीसोबत झालेल्या वादामुळे सुरैश रैना IPL सोडून भारतात परतला?
बीसीसीआयच्या सूत्रांनी आयएनएसला सांगितले की, 'स्टारने आपल्या टीव्ही टीमच्या पहिल्या टीमला 31 ऑगस्टपर्यंत युएईला जाण्यास सांगितले होते. शनिवारी प्रत्येकाची कोरोना चाचणी घेण्यात आली होती, त्यातील एक सदस्य पॉझिटिव्ह आढळून आला. ही बातमी मिळताच ब्रॉडकास्टर्सनी सर्वांना युएईला उड्डाण न पकडण्याचे आदेश दिले.
वाचा-'कुटुंबासोबत असताना मास्क वापरत नाही', कोरोना पॉझिटिव्ह CSK खेळाडूचे चॅट VIRAL
आयपीएलचे वेळापत्रक जारी करण्यात आलेले नाही
यूएईला पोहोचताच टीव्ही क्रुने क्वारंटाइन केले होते. दुसरीकडे कोरोनामुळे बीसीसीआयने अद्याप वेळापत्रक जारी केलेले नाही आहे. चाहते, फ्रेंचायजी आणि खेळाडू उत्सुकतेने याची वाट पाहत आहेत. आयपीएलसाठी सहा संघ थेट दुबईला पोहोचले असताना मुंबई इंडियन्स आणि केकेआरची टीम अबू धाबीमध्ये आहे.