दुबई, 26 ऑक्टोबर : आयपीएल टी -20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी राजस्थान रॉयल्सच्या बेन स्टोक्सने दमदार शतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात त्याने नाबाद 107 धावा करत आयपीएलमधलं दुसरं शतक पूर्ण केलं. त्याला संजू सॅमसनने नाबाद 54 धावा करत साथ दिली त्यामुळे राजस्थानने मुंबईवर 8 गडी राखून विजय मिळवला.
जरी सामना जिंकला असला तरीही राजस्थानला प्लेऑफमध्ये जागा मिळणं कठीण आहे त्यामुळे बेन स्टोक्सलाही खंत वाटली. सामन्यानंतर तो म्हणाला, ‘खरं सांगायचं तर हे यश थोडं कडूगोड आहे. या आधी दोन-तीन सामन्यांत माझा हा फॉर्म आला असता तर खूप बरं झालं असतं. त्या वेळी प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी आम्हाला इतरांच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागत नव्हतं. सलगच्या सामन्यांत चांगला फॉर्म असणं चांगलंच. आम्हालाही विजय हवा होता आणि त्यामुळे या विजयाला महत्त्व आहे. सामन्याच्या आदल्यादिवशी मी सराव केला होता आणि मैदानात आत्मविश्वासाने उतरलो होतो.’ स्टोक्सचे वडिल ब्रेन कॅन्सरने आजारी आहेत त्यामुळे तो या स्पर्धेत थोडा उशिरा सहभागी झाला आहे.
तो म्हणाला, ‘ शॉर्ट असो किंवा फुल चेंडू व्यवस्थित येत होता. जेव्हा चेंडू खेळपट्टीवर अडकून वर यायचा तेव्हा फलंदाजी करायला थोडं कठीण जात होतं. आम्ही ज्या येईल त्याच गोलंदाजावर दबाव निर्माण करू शकलो हे चांगलं झालं. ते बुमराहला गोलंदाजीला आणतील याचा अंदाज आम्हाला होताच. पण त्याचाही आम्ही अपेक्षेपेक्षा चांगला सामना करू शकलो. आता माझ्या घरी जरा गंभीर परिस्थिती आहे त्यामुळे काळ कठीण आहे पण माझ्या खेळामुळे माझ्या कुटुंबियांनाही आनंद झाला असेल अशी अपेक्षा करतो.’ स्टोक्सला संजू सॅमसनने नाबाद 54 धावा करत चांगला पाठिंबा दिला त्या दोघांनी नाबाद 152 धावांची भागीदारी केली. या मोसमात संजूच्या खेळात सातत्य नव्हतं पण कालच्या सामन्यात त्यानी सैलसर चेंडूंवर आपला संयम सोडला नाही असं त्यानी सांगितलं.
संजू म्हणाला, ‘ जेव्हा तुम्ही 14 सामने खेळता तेव्हा परिस्थिती वर-खाली होणारच पण मी स्वत: वर विश्वास ठेवला. माझ्या गेम प्लॅनवर मी जरा काम केलं. मोठ्या मैदानांवर आणि कठीण खेळपट्ट्यांवर तुम्हाला सरावायला थोडा अधिक वेळ द्यावा लागतो. तंत्राने खेळावं लागतं आणि तेच मी आज केलं. स्टोक्ससोबत फलंदाजी करण्यात खूपच मजा आली. गेल्या तीन सामन्यांत आम्ही भागीदारी केली त्यात आनंद मिळाला.’
संजू पुढे म्हणाला, ‘आम्हाला किती धावा हव्यात आणि किती सरासरी हवी हेच मी बघत होतो. चेंडू बघायचा आणि फटकवण्यासारखा असेल तरच फटकवायचा एवढाच माझा गेम प्लॅन होता आणि मी तसंच खेळलो. टोलवण्यासारखा चेंडू नसेल तर एक किंवा दोन धावा घ्यायच्या हाच माझा साधा मंत्र होता. मला शेवटपर्यंत मैदानात रहायचं होतं आणि कालच्या सामन्यात आम्ही ते करू शकलो. मी स्वत: ला वेळ दिला पण चौकारही शोधत होतो. राहुल चहरच्या गोलंदाजीवर चौकार मारायचा विचार होता पण ते जमलं नाही. खरंच सांगायचं तर षटकार ठोकण्याची कुठली पद्दधत नाहीए, फक्त खराब चेंडू बघायचा आणि टोलवायचा एवढंच. सेलिब्रेट करताना तो त्याचे बायसेप्स दाखवतो त्याबद्दल तो म्हणाला तसं केल्यामुळे मी खूप दणकट आहे याची मी स्वत: ला जाणीव करून देतो. त्यामुळे मला लक्षात येतं की मी दणकट आहे आणि षटकार मारू शकतो.’