IPL 2020 अजिंक्य रहाणेची 'जागा' धोक्यात? सलामीला यायची शक्यता कमी

IPL 2020 अजिंक्य रहाणेची 'जागा' धोक्यात? सलामीला यायची शक्यता कमी

IPL च्या ताज्या हंगामासाठी तो राजस्थान रॉयल संघातून दिल्लीच्या संघात दाखल झाल्यानंतर मात्र त्याच्या ओपनरच्या पोझिशनला धक्का लागण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : भारतीय कसोटी संघाचा उपकप्तान असलेल्या अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) T20 मध्ये बॅटिंगला यायची जागा जवळपास निश्चित असते. IPL च्या ताज्या हंगामासाठी तो राजस्थान रॉयल संघातून दिल्लीच्या संघात दाखल झाल्यानंतर मात्र त्याच्या ओपनरच्या पोझिशनला धक्का लागण्याची शक्यता आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या संघात बरेच फलंदाज सलामीला येण्यासारखे आहेत. त्यामुळे कदाचित अजिंक्यसारख्या कसलेल्या फलंदाजाला फिनिशरची भूमिका बजावावी लागू शकते. यासाठी आपण तयार असल्याचं खुद्द अजिंक्यनेच सांगितलं आहे.

शिखर धवन, पृथ्वी शॉ यांच्यासारखे फलंदाज आहेत. शिवाय श्रेयस अय्यर, शिमरोन हेटमेयर आणि ऋषभ पंत अशी फलंदाजांची तगडी फळी आहे. अजिंक्यला त्याच्या दिल्लीतल्या संघातल्या स्थानाविषयी विचारल्यावर तो म्हणाला, "मी कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करणार मला माहीत नाही. सध्या सराव सत्र सुरू आहे. आत्ताच यावर बोलता येणार नाही."

अजिंक्य रहाणे म्हणाला, "मी टीमने दिलेली कुठलीही जबाबदारी पूर्ण ताकदीने पार पाडली आहे. आताही माझी तीच तयारी आहे."

अजिंक्यने आपली कुठल्याही क्रमांकावर फलंदाजीस उतरण्याची तयारी असल्याचं स्वतःच सांगितलं. "मी आतापर्यंत मिळालेल्या कुठल्याही संधीचा फायदा घेत 100 टक्के देण्याचा प्रयत्न केला. या वेळी दिल्लीच्या संघातही मी तसाच खेळणार. टीम माझ्याकडे जी जबाबदारी देईल ती पार पाडण्यासाठी मी 100 टक्के प्रयत्न करेन", असं रहाणेनं सांगितलं.

आपण टीममध्ये फिनिशरची भूमिका निभावायलासुद्धा तयार आहोत, असं रहाणे म्हणाला. T20 क्रिकेटमध्ये 196 सामन्यांत मिळून अजिंक्यने 4988 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून गेल्यावर्षीची IPL खेळताना अजिंक्य सलामीचा फलंदाज म्हणूनच खेळला. "मला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं, तरी माझी तयारी आहे. माझ्या खेळासाठी ते नवं आव्हान असेल आणि त्यामुळे खेळाची उंची वाढवता येईल. त्यामुळे मला विचाराल या क्रमांकावर येशील का, तर माझं उत्तर हो असेल. टीमची गरज असेल आणि मला जी जबाबदारी देण्यात आली असेल ती मी व्यवस्थित पार पाडीन", असं मुंबईकर अजिंक्य रहाणेनं सांगितलं.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 27, 2020, 7:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या