चेन्नई, 06 मे : आयपीएलचा बारावा हंगाम आता सध्या शेवटच्या टप्प्यात आला आहे. मंगळवारपासून लगेचच प्ले ऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना चेन्नई विरुद्ध मुंबई असा चेपॉकवर होणार आहे. त्यामुळं घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा चेन्नईला नक्कीच होणार आहे. मात्र या सामन्याआधीच धोनीच्या चिंता वाढल्या आहेत. कारण चेन्नईचा मुख्य अष्टपैलु गोलंदाज दुखापतीमुळं माघारी परतला आहे.
आयपीएलनंतर लगेचच विश्वचषकाला सुरुवात होत असल्यानं क्रिकेट चाहत्यांसाठी ही पर्वणीच असणार आहे. मात्र, यातच आयपीएलमुळं खेळाडूंचे दुखापतग्रस्त होण्याचे प्रमाणही वाढलं. यातच आता, प्ले ऑफआधी चेन्नईला फटका बसला आहे. त्यामुळं धोनीच्या चिंता वाढल्या आहेत. चेन्नईचा केदार जाधव हा पंजाब विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला. त्यामुळं ते आयपीएलच्या हंगामातील सर्व सामन्यांना मुकणार आहे.
The Lion that will be sitting it out for the rest of the season. Wishing our Kedar a super speedy recovery from the sustained shoulder injury! The Pride will miss you. #Yellovepic.twitter.com/3wnYKzTYoz
रविवारी आयपीएलमध्ये झालेल्या पंजाब आणि चेन्नई यांच्यात सामन्यात पंजाबनं 6 विकेटनं विजय मिळवला. पंजाबनं नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला, आणि चेन्नईनं प्रथम फलंदाजी करत पंजाबला 171 धावांचे आव्हान दिलं. दरम्यान राहुल आणि गेल यांनी धडाकेबाज फलंदाजी करत, तब्बल 108 धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावरच पंजाबनं हा सामना जिंकला. अखेर हरभजननं ही भागीदारी तोडली. मात्र 14व्या ओव्हरमध्ये एक अशी घटना घडली, ज्यामुळं महेंद्रसिंग धोनीच्या चिंता वाढणार आहेत.
पंजाब आणि चेन्नई यांच्यात झालेल्या सामन्यातील 14 ओव्हरमध्ये एक अजब घटना घडली. ब्राव्होच्या ओव्हरमध्ये दुसऱ्याच चेंडूवर पुरननं ड्राईव्ह लगावला, चेंडू सीमारेषेजवळ जडेजानं अडवला खरा पण त्यानं केलेला थ्रो ब्राव्होला पकडता आला नाही. दरम्यान चेंडू पुन्हा सीमारेषेजवळ गेला. त्यावेळी केदार जाधव फिल्डिंग करत असताना, त्याच्या खांद्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असावी, कारण लगेचच केदार मैदानाबाहेर पडला. दरम्यान याच ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर एक धाव काढत असताना ब्राव्हो आणि पुरन एकमेकांवर आदळले.
भारताने विश्वचषकासाठी जाहीर केलेल्या 15 खेळाडूंच्या यादीत केदार जाधवचही नाव आहे. दरम्यान, काही दिवासांवर विश्वचषक आला असताना, खेळाडूंची ही दुखापत संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. जर केदार जाधवची ही दुखापत गंभीर असेल तर त्याला विश्वचषकालाही मुकावं लागेल. त्यामुळं केदार जाधवच्या जागी रिषभ पंत किंवा अंबाती रायडू यांना संघात संधी मिळू शकते. रिषभ पंतला सध्या राखीव खेळाडू म्हणून ठेवले आहे.