News18 Lokmat

'वडापाव'ची चव न्यारी, मुंबईच पुण्यावर भारी; मुंबई इंडियन्स तिसऱ्यांदा चॅम्पियन्स

अंतिम सामन्यात मुंबईने अक्षरश : पुणेकरांच्या तोंडून घास हिरावून घेतला. अवघ्या एका धावेनं विजय मिळवत मुंबई इंडियन्स आयपीएलच्या दहाव्या हंगामाची चॅम्पियन्स ठरली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 22, 2017 01:00 AM IST

'वडापाव'ची चव न्यारी, मुंबईच पुण्यावर भारी; मुंबई इंडियन्स तिसऱ्यांदा चॅम्पियन्स

22 मे : मिसळपाव की मुंबईचा वडापाव...मुंबईकर की पुणेकर...सारसबाग की राणीची बाग...असा रंगलेला अस्मितेचा सामना अखेर विशाल अशा स्वप्ननगरी अर्थात मुंबईने जिंकला. अखेरच्या चेंडुपर्यंत उत्कंठा ताणून धरलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने अक्षरश : पुणेकरांच्या तोंडून घास हिरावून घेतला. अवघ्या एका धावेनं विजय मिळवत मुंबई इंडियन्स आयपीएलच्या दहाव्या हंगामाची चॅम्पियन्स ठरली.

आयपीएलच्या दहाव्या हंगामाची हैदराबादमध्ये सांगता झाली. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांच्या नावाने मैदानात उतरलेल्या या टीमभोवती जणू मुंबईकर विरुद्ध पुणेकर असा सामनाच रंगला.

नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सलामीला उतरलेले पार्थिव पटेल आणि सिमन्स झटपट बाद झाले. त्यानंतर ४१ रन्सवर अंबाती रायडू बाद झाला. कॅप्टन रोहित शर्माने टीमची कमान सांभाळत चांगली फटकेबाजी केली. पण तोही २४ धावा करून बाद झाला. अकराव्या ओव्हर्समध्ये ५६ वर ४ बाद अशी अवस्था झाली. मुंबईत इंडियन्सचं काय अशी चिंता मुंबईच्या चाहत्य़ांना लागली होती. हार्दिक पांड्य़ा आणि पोलाॅर्डही खास खेळी करू शकले नाही. सात बाद 79 अशी बिकट अवस्था  झालेल्या मुंबईला कृणाल पांड्याने सावरलं. 38 चेंडूत 47 धावांची खेळी करणाऱ्या  कृणालने  मिचेल जॉन्सनच्या साथीने आठव्या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी करत मुंबईला सव्वाशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. पुण्याकडून उनाडकट, झम्पा आणि ख्रिस्टियान यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

130 रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या पुणे टीमने सावध सुरुवात केली. अजिंक्य रहाणे दमदार फलंदाजी करत स्कोअरबोर्ड हलता ठेवला. राहुल त्रिपाठी ३ धावांवर बाद झाला.एवढाच धक्का पुण्याला बसला. त्यानंतर कर्णधार स्मिथ आणि रहाणेनं शानदार फलंदाजी करत पुणे टीमला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं. टीमचा विजय टप्यात दिसत असताना ४४ धावांवर रहाणेला पोलाॅर्डने झेल घेत  बाद केलं. त्यानंतर महेंद्रसिंग धोणी मैदानात उतरला. धोणी आणि स्मिथ मैदानात असल्याचं पाहून विजय आणखी जवळ आला. पण, जसप्रीत ब्रुमराच्या षटकात धोणी पार्थिव पटेलच्या हाती झेल देऊन १० धावांवर आऊट झाला. तरी दुसरीकडे स्मिथने आपली खेळी सुरूच ठेवत अर्धशतक पूर्ण केलं. आता पुणे टीम जिंकणार अशी आशा स्मिथकडून बाळगली जात असतानाच जाॅन्सनच्या बाॅलवर अंबाती रायडूने सुंदर झेल घेत मुंबई इंडियन्सला मॅचमध्ये परत आणलं. स्मिथ बाद झाल्यामुळे मुंबईच्या चाहत्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले. अखेरच्या षटकात स्मिथ बाद झाल्यानंतर चौकार मारण्याच्या नादात डॅनियल बाद झाला आणि पुण्याचा अवघ्या १ रन्सने पराभव झाला. आयपीएलमध्ये मुंबईने १ धावाने विजय मिळवत आयपीएलचं विजेतेपद पटकावलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2017 11:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...