मुंबई, 8 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या या मोसमातही बँगलोर (RCB)च्या पदरी निराशा आली. प्ले-ऑफच्या एलिमिनेटर सामन्यामध्ये हैदराबाद (SRH)ने बँगलोरचा पराभव केला. त्यामुळे विराट कोहली (Virat Kohli)चं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वावर टीका होऊ लागली. गौतम गंभीर याने तर बँगलोरने आता विराटच्याऐवजी दुसऱ्या कोणाला तरी कर्णधार करावं, अशी मागणी केली. पण बँगलोरचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच आणि क्रिकेट संचालक माईक हेसन यांना मात्र असं वाटत नाही.
विराटविषयी बोलताना कॅटिच म्हणाला, 'कोहलीसारखं नेतृत्व मिळाल्यामुळे आम्ही खूप भाग्यवान आहोत. विराटला खेळाडूंकडून सन्मान मिळतो. तो युवा खेळाडू खासकरून देवदत्त पडिक्कलसोबत खूप वेळ घालवतो. असा दृष्टीकोन इतर खेळाडूंमध्ये नसतो. आम्ही स्पर्धेत शेवटपर्यंत आव्हान उभं केलं. याचं बहुतेक श्रेय विराटला जातं.'
कोहलीसाठी यंदाची आयपीएल निराशाजनक राहिली. 15 मॅचमध्ये त्याने 121.35 च्या स्ट्राईक रेटने 450 रन केले. या मोसमात मधल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करताना विराट संघर्ष करताना दिसला.
टीमसोबत याचवर्षी जोडले गेलेले माईक हेसन यांनीही विराटचं कौतुक केलं आहे. 'आम्ही टीमच्या कामगिरीची समिक्षा करू आणि मग निर्णय घेऊ. आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही,' असं हेसन म्हणाले. हेसन आणि कॅटिच यांनी लेग स्पिनर युझवेंद्र चहलचंही कौतुक केलं. तसंच देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांच्यासारख्या नवोदित खेळाडूंचीही त्यांनी प्रशंसा केली.