INDWvsENGW : स्मृतीचं दुहेरी अपयश, भारताचा पहिल्या टी20 सामन्यात दारुण पराभव

INDWvsENGW : स्मृतीचं दुहेरी अपयश, भारताचा पहिल्या टी20 सामन्यात दारुण पराभव

इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात भारताचा 41 धावांनी पराभव

  • Share this:

गुवाहाटी, 4 मार्च : भारतीय महिला क्रिकेट संघाचे पहिल्यांदाच नेतृत्व करणाऱ्या स्मृती मानधनाला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात कर्णधार पदाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पहिल्या टी 20 सामन्यात इंग्लंडने भारताचा 41 धावांनी पराभव केला. इंग्लंडने दिलेल्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 119 धावांपर्यंत मजल मारू शकला.

भारताचा निम्मा संघ 10 षटकांत 46 धावांमध्ये तंबूत परतला होता. सलामीची फलंदाज हरलीन देओल 8 धावांवर बाद झाली. त्यानंतर स्मृती मानधना आणि जेमिमाह रॉड्रिग्जला लिनसे स्मिथने बाद करून सलग दोन धक्के दिले. मिताली राज आणि वेदा कृष्णमूर्ती यांनाही जास्त काळ मैदानावर टिकून राहता आले नाही. मिताली 8 धावांवर तर वेदा कृष्णमूर्ती 15 धावांवर बाद झाली. वेदा कृष्णमूर्ती बाद झाली तेव्हा भारताच्या 5 बाद 46 धावा झाल्या होत्या. त्यानंतर दिप्ती शर्मा आणि अरुंधती रेड्डी यांनी पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला. पण संघाची धावसंख्या 76 असताना इंग्लंडची गोलंदाज ब्रंटने अरुंधतीला 18 धावांवर बाद केले. त्यानंतर विजयासाठी आवश्यक धावांची धावगती भारताच्या आवाक्याबाहेर गेली. इंग्लंडकडून ब्रंट आणि स्मिथ यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर श्रबसोल आणि क्रॉस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. बिउमॉन्टच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने 4 बाद 160 धावा केल्या. बिउमॉन्टशिवाय डॅनिअल वॅट (35 धावा)आणि हिथर नाईट (40 धावा)यांच्या खेळीने इंग्लंडने भारतासमोर 161 धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून गोलंदाज राधा यादवने दोन तर शिखा पांडे आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

वाचा : सचिन, विराटलाही मिळाला नाही 'हा' मान, स्मृतीच्या नावावर नवा विक्रम

इंग्लंडविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने 2-1 अशी जिंकली आहे. एकदिवसीय मालिकेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या स्मृती मानधनाला या सामन्यात मात्र धावा करता आल्या नाहीत. त्यातच भारताची सलामीची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्जचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे.

First published: March 4, 2019, 1:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading