बे ओव्हल, 26 जानेवारी : भारताने न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना 90 धावांनी जिंकून ५ सामन्यांच्या मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. भारताने दिलेल्या 325 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 234 धावांत गुंडाळला. भारताच्या सालामीवीरांनी केलेल्या दीडशतकी भागिदारीनंतर गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली.
भारताच्या गोलंदाजांमध्ये कुलदीप यादवने सर्वाधिक 4 गडी बाद केले. त्याशिवाय भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहलने प्रत्येकी २ तर केदार जाधव आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंडच्या टॉम लॅथम (31) आणि कॉलिन मुनरो (34)यांच्यानंतर ब्रेसवेलने अर्धशतकी खेळी केली. त्यांच्याशिवाय इतर फलंदाज भारतीय गोलंदाजासमोर टिकाव धरू शकले नाहीत.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने 4 बाद 324 धावा केल्या. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडसमोर 325 धावांचे आव्हान ठेवले होते.
भारताच्या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 154 धावांची भागिदारी केली. शिखर धवन 66 धावा काढून बाद झाल्यानंतर रोहित शर्मा देखील लगेच बाद झाला. त्याने 96 चेंडूत 87 धावा केल्या. त्यानंतर कोहली, रायडू आणि धोनीने संघाला 300 चा टप्पा पार करून दिला.
हिटमॅन रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताकडून कोणत्याही विकेटसाठी सर्वात जास्त शतकी भागिदारी करणाऱ्या जोडीत तेंडुलकर आणि सेहवाग यांना मागे टाकले आहे. रोहित-धवन यांनी 14 शतकी भागिदारी करून ते तिसऱ्या स्थानावर पोहचले आहेत.
भारताकडून सर्वात जास्त 26 शतकी भागिदारी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी केल्या आहेत. क्रिकेट खेळणाऱ्या कोणत्याही संघाकडून शतकी भागिदारी करण्यात सचिन-सौरवचे नाव आघाडीवर आहे.