सिडनी, 12 जानेवारी : भारताविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्याद्वारे महेंद्रसिंह धोनीचे बऱ्याच दिवसांनंतर पुनरागमन होत आहे.
कसोटी मालिकेत कांगारूंना धूळ चारल्यानंतर आता वनडेतही विजय मिळवण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. तर घरच्या मैदानात कसोटी मालिकेत पराभवाने नामुष्की ओढवलेला ऑस्ट्रेलियन संघही विजयासाठी प्रयत्न करेन.
बुमराह संघाबाहेर
कसोटी मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने दमदार कामगिरी केली. पण बुमराह आता वनडे मालिकेला मुकणार आहे. कारण त्याला विश्रांती देण्याचा निर्णय संघव्यवस्थापनाकडून घेण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी बुमराहच्या जागी युवा गोलंदाज मोहम्मद सिराज याला संधी देण्यात आली आहे. तर आणखी एक वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल याला टी-20 संघात स्थान देण्यात आलं आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 ने जिंकत इतिहास रचला. त्यानंतर आता वनडेतही कागांरूंना धूळ चारण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद आणि मोहम्मद शमी
VIDEO : भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर विरुष्कानं असं केलं सेलिब्रेशन