मुंबई, 14 जून : भारतीय बुद्धिबळपटू सौम्या स्वामीनाथन हिने पुढच्या महिन्यात इराणमध्ये आयोजित बुद्धिबळ स्पर्धेतून माघार घेतली आहे. इराणसारख्या मुस्लीम देशांमध्ये बुरखा घालणं अनिवार्य आहे, याच नियमाला विरोध करत तिने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
याबद्दल तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने लिहलं आहे की, 'जबरदस्तीने बुरखा घालणं म्हणजे मानवी हक्कांविरूद्ध आहे.' त्याचबरोबर हे आपल्या स्वातंत्र्य आणि धर्माच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचंही म्हटलं आहे.
मला जबरदस्ती बुरखा घालण्यासाठी सांगण चुकीचं आहे. हे सौम्याच्या विचारांच्या विरुद्ध असल्यामुळे या स्पर्धेतून बाहेर जाण्याचा निर्णय सौम्याने घेतला आहे. ही स्पर्धा 26 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. पण त्याआधीच सौम्याने माघार घेतली आहे.
कोणतीही अधिकृत चॅम्पियनशिप आयोजित करताना खेळाडूंच्या अधिकारांचा फारसा विचार केला जात नाही असंही सौम्या म्हणाली आहे. ती पुढे म्हणाली की, 'आयोजक कुठल्याही चॅम्पियनशिपमध्ये आपल्या देशाची औपचारिकता आणि देशाचं प्रतिनिधीत्व करू इच्छितात हे मी समजू शकते, पण कोणत्याही धर्माशी संलग्न पोशाख घालण्यासाठी ते स्पर्धकांना जबरदस्ती करू शकत नाहीत.'
या स्पर्धेत मी भाग घेत नाही आहे याचं मला दुख आहे. पण काही गोष्टी या बदलायला हव्यात असं सौम्याचं मत आहे.