मुंबई, 15 मे : भारताची महिला क्रिकेट टीम (Indian Women Cricket team) पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टीममध्ये वेदा कृष्णमूर्तीचा (Veda Krishnamurthy) समावेश करण्यात आलेला नाही. वेदाची आई आणि मोठ्या बहिणीचं काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे निधन झालेलं आहे. वेदानं आई-बहिण गमावण्याची भावना काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मांडली होती.
ऑस्ट्रेलियाचाी माजी क्रिकेटपटू लिसा स्थळेकर (Lisa Sthalekar) हीनं या प्रकरणात बीसीसीआयवर आरोप केला आहे. वेदाची बीसीसीआयनं विचारपूस देखील केली नाही, असा आरोप करणारी पोस्ट तिनं सोशल मीडियावर लिहिली आहे.
'इंग्लंड दौऱ्यासाठी वेदाची निवड न होणे हे एक प्रकारे योग्य आहे. मात्र करारबद्ध खेळाडूशी बीसीसीआयनं कोणत्याही प्रकारचा संपर्क केला नाही. सध्याच्या परिस्थितीमधून सावरण्यासाठी तू काय करत आहेस, याची विचारपूस केली नाही, याचा मला राग आहे. ' असं लिसानं म्हंटलं आहे.
'एका चांगल्या क्रिकेट बोर्डानं त्यांच्या खेळाडूंची काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त खेळाची काळजी करु नये. अत्यंत निराशाजनक. माजी क्रिकेटपटू या नात्यानं एसीएकडून आमची रोज विचारपूस केली जाते. आम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. भारतीय क्रिकेट बोर्डानं देखील खेळाडूला गरज असेल तर हे सर्व केलं पाहिजे.' असा सल्ला लिसानं दिला आहे.
There is still time to fix this!! pic.twitter.com/LT3hApMioJ
— Lisa Sthalekar (@sthalekar93) May 15, 2021
वेदा कृष्णमूर्तीच्या आईचं 23 एप्रिल रोजी कोरोनामुळे निधन झालं. त्यानंतर दोन आठवड्यानी तिच्या मोठ्या बहिणीचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Cricket