नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर: टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) सलग दोन पराभवामुळे सेमी फायनल गाठण्याची टीम इंडियाची आशा आता जर-तरमध्ये अडकली आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजली जाणारी भारतीय क्रिकेट टीम (Team India) पहिल्या दोन मॅचमध्ये पराभूत झाली आहे. टीम इंडियाची ही निराशजनक कामगिरी पाहता चाहत्यांना दोन तगड्या खेळाडूंची (india missing two player) आठवण येऊ लागली आहे.
टीम इंडियाचा सलामीवीर आणि स्टार फलंदाज शिखर धवनला भारतीय संघाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघात स्थान मिळाले नाही. पण आयपीएलमध्ये धवनची बॅट चांगलीच तळपली असल्याचे पाहायला मिळाले. त्याने 16 सामन्यांमध्ये 587 धावा केल्या, ज्यामुळे दिल्लीला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळाली. धवन अतिशय आक्रमक फलंदाजी करतो आणि तो षटकार मारण्यात माहीर आहे.
भारतीय संघाची सलामीची जोडी टी-20 वर्ल्ड कपमध्ये फ्लॉप ठरली आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना मोठी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे टीम इंडियाला सर्वोत्तम सलामीवीर शिखर धवनची उणीव भासत आहे.
शिखर धवन हा मोठ्या सामन्यांचा खेळाडू आहे. 2013 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने या स्पर्धेत 363 धावा केल्या होत्या आणि 2017 मध्ये 338 धावा केल्या होत्या. 2015 च्या विश्वचषकातही धवनने आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवले होते. जेव्हा तो भारताकडून सर्वाधिक 412 धावा करणारा फलंदाज होता.
टीम इंडियाची गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत निराशाजनक कामगिरी राहिली. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकाही गोलंदाजाला कमालीची खेळी करता आलेली नाही. त्यामुळे, चाहत्यांना स्पिनर युजवेंद्र चहलची कमी भासत आहे.
स्टार लेग-स्पिनर युजवेंद्र चहल देखील टी-20 वर्ल्ड 2021 मध्ये टीम इंडियाचा भाग नाही. चहलने आयपीएलमधील आपल्या कामगिरीने वादळ निर्माण केले. आरसीबीकडून खेळताना 15 सामन्यांमध्ये 18 विकेट घेतल्या आहेत. यूएईच्या खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहेत. आयपीएलचा दुसरा टप्पा यूएईमध्येच खेळला गेला. या उत्कृष्ट फिरकीपटूचा संघात समावेश केला असता, तर भारताची एवढी वाईट अवस्था झाली नसती. असे मत क्रिकेटप्रेमिंनी व्यक्त केली आहे.
तसेच, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू इम्रान ताहिरनेही चहलला संघात स्थान न दिल्याने टीका केली आहे. चहलच्या गुगली आणि लेग स्पिनची जादू संपूर्ण जगाला माहीत आहे. टीम इंडियामध्ये समाविष्ट असलेला कोणताही फिरकीपटू चांगली कामगिरी करू शकलेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.