नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी: भारताचा यष्टिरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलचा (ICC) 'प्लेअर ऑफ द मंथ' (Player of the Month Award) हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आयसीसीने या पुरस्काराची सुरुवात याचवर्षी केली आहे. ऋषभ पंत हा पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू (1st Player) ठरला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) व आयर्लंडचा खेळाडू पॉल स्टर्लिंग (Paul Stirling) हे आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट 'प्लेअर ऑफ द मंथ'च्या शर्यतीत होते. त्यांना मागे टाकून भारताच्या युवा खेळाडूने या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे.
23 वर्षीय पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारल्यामुळे भारताला तो सामना अनिर्णित राखता आला होता. तर ब्रिस्बेनच्या कसोटी सामन्यात पंतने नाबाद 89 धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीमुळे भारताला ऐतिहासिक मालिका जिंकता आली. या पुरस्काराच्या निमित्ताने आयसीसीने म्हटलं की, हा पुरस्कार वर्षभर प्रत्येक क्रिडाप्रकरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुरूष आणि महिला क्रिकेटपटूंना देण्यात येणार आहे.
हे ही वाचा-R Ashwin ने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत रचला इतिहास;114 वर्षानंतर केली ही कामगिरी
पंतने हा पुरस्कार टीम इंडियाला समर्पित केला
आयसीसीचा 'प्लेअर ऑफ द मंथ' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतने आनंद व्यक्त केला आहे. यावेळी त्याने हा पुरस्कार टीम इंडियाला समर्पित केला आहे. पंतने आयसीसीला जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, “कोणत्याही खेळाडूसाठी संघाच्या विजयात योगदान देणं, हाच मोठा सन्मान असतो. याप्रकारचा पुरस्कार युवकांना प्रेरणा देण्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकतो.' पंतने पुढे म्हटले की, 'हा पुरस्कार मी टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला समर्पित करतो. ज्यांनी ऑस्ट्रेलियामधील भारताच्या विजयात महत्त्वाच योगदान दिलं आहे. त्याचबरोबर मला मतदान करणाऱ्या सर्व चाहत्यांचं मी आभार मानतो. चेन्नईत खेळल्या जाणार्या पहिल्या कसोटीच्या तिसर्या दिवशीही पंतने इंग्लंडविरुद्ध 91 धावांची आक्रमक खेळी साकारली आहे.
पंतने हा पुरस्कार जिंकल्यानंतर आयसीसी व्होटिंग अॅकॅडमीचे सदस्य आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीज राजा म्हणाले की, ऋषभ पंतने दोन्ही सामने दडपणाखाली खेळले आहेत. यावेळी त्याला वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे. त्याने सामना अनिर्णित राखताना आणि सामना जिंकताना विविध कौशल्ये दाखवली आहेत. हे दोन्हा सामने खेळताना ऋषभ पंतची सकारात्मक मानसिकता पाहायला मिळाली, असंही रमीज राजा यांनी म्हटलं आहे.
शबनीम इस्माईल ठरल्या 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या महिला क्रिकेटपटू
दक्षिण आफ्रिकेच्या शबनीम इस्माईल यांना 'प्लेअर ऑफ द मंथ' हा पुरस्कार मिळाला आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी तीन एकदिवसीय आणि दोन टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तिने पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सात गडी बाद केले होते. याच संघाविरुद्ध दुसर्या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तिने पाच बळी पटकावले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Rishabh pant