INDvsNZ : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीमध्ये पंतला संधी? असा असेल भारतीय संघ

INDvsNZ : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीमध्ये पंतला संधी? असा असेल भारतीय संघ

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. टी20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर उद्यापासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.

  • Share this:

वेलिंग्टन, 20 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. टी20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर उद्यापासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. टी20 मध्ये भारताने 5-0 ने बाजी मारली तर एकदिवसीय मालिका न्यूझीलंडने जिंकली. विराटच्या नेतृत्वाखाली सध्या भारताचा कसोटी संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने यात कोण बाजी मारणार हे सांगणं कठीण आहे. या मालिकेत विराट कोहली अंतिम अकरा जणांमध्ये कोणाला संधी देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. पहिल्या सामन्यासाठी पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांना सलामीला संधी मिळू शकते. विराटने पृथ्वी शॉ डावाची सुरुवात करेल असं म्हटलं होतं.

पृथ्वी शॉने आतापर्यंत दोन कसोटीत एक शतक आणि दोन अर्धशतकं केली आहेत. त्याने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यात तीन सामन्यात त्याने 20, 24 आणि 40 धावा केल्या. तर मयंक अग्रवाल आतापर्यंत 9 कसोटी खेळला असून त्याने 872 धावा केल्या आहेत. यात तीन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

भारताचा कसोटीमध्ये भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर खेलण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड इलेव्हनविरुद्ध त्याने सराव सामन्यात 93 धावांची खेळी केली होती. त्याशिवाय दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश दौऱ्यातही त्यानं जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन केलं होतं.

अजिंक्य रहाणेनं दोन वर्षांनी कसोटी शतक साजरं केलं. हीच लय कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. परदेशात धावा करणाऱ्या रहाणेला घरच्या मैदानावर मात्र फारसं यश मिळालेलं नाही. कसोटीत 10 शतकं करणाऱ्या रहाणेनं भारतात फक्त 3 शतकं केली आहेत.

मधल्या फळीत फलंदाजीची जबाबदारी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर असणार आहे. अजिंक्य रहाणे उपकर्णधार असून सध्या तो फॉर्ममध्ये आहे. सराव सामन्यात त्याने शतकी खेळीही केली आहे.  हनुमा विहारीनेसुद्धा संघात जागा पक्की केली आहे. त्यानं आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक महत्वाच्या खेळी साकारल्या आहेत. वेगवान खेळपट्टीवर जर आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले तर हनुमा संघासाठी संकटमोचक ठरू शकतो.

पंतला संधी?

कसोटी संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी ऋद्धिमान साहाच्या खांद्यावर आहे. मात्र, त्याच्या जागी पंतला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. भारतात फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर साहा चांगला पर्याय होता पण न्यूझीलंडमध्ये उसळत्या खेळपट्ट्यांवर पंतचा पर्याय वापरला जाऊ शकतो.

इशांत शर्माचे पुनरागमन

गोलंदाजांमध्ये रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्यात कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जडेजाच्या तुलनेत अश्विनचं पारडं जड आहे. तर नुकताच दुखापतीतून बाहेर आलेला इशांत शर्मा पुनरागमन करणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध इशांतच्या रुपाने मोठं अस्त्र टीम इंडियाकडे असणार आहे.

भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा इशांतसह मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या खांद्यावर असेल. शमीने तीनही प्रकारत स्वत:ला सिद्ध केलं आहे. तसंच स्टार गोलंदाज बुमराहला न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत एकही विकेट घेता आली नसली तरी कसोटीत कामगिरी चांगली आहे.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन : पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

वाचा : हार्दिक पांड्या फिट झाला नाही तर, मुंबई इंडियन्सकडे असणार ‘हे’ 5 पर्याय

First published: February 20, 2020, 9:14 PM IST

ताज्या बातम्या