22 आॅक्टोबर : भारतीय हॉकी संघाने आशिया कप हाॅकी स्पर्धा जिंकलीय. आज झालेल्या अंतिम लढतीत भारताने मलेशियावर 2-1 अशी मात करत आशिया चषक हॉकीचे विजेतेपद पटकावले. रमणदीप सिंग आणि ललित उपाध्याय यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
आशिया चषक हॉकीतील भारताचे हे तिसरे विजेतेपद आहे. याआधी 2003 साली मलेशियातील क्वालालंपूर येथे आणि 2007 साली मायदेशातील चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेत भारताने विजेतेपदाला गवसणी घातली होती. तर 2013 साली मलेशियातील इपोह येथे झालेल्या स्पर्धेत दक्षिण कोरियाकडून पराभूत होऊन भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
आज झालेल्या अंतिम लढतीत भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. रमणदीप सिंगने तिसऱ्या मिनिटालाच गोल करून भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 29 व्या मिनिटाला ललित उपाध्यायने गोल करून भारताची आघाडी 2-0 अशी वाढवली. मध्यांतराला 2-0 अशी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाचा खेळ उत्तरार्धात काहीसा मंदावला. त्यातच मलेशियाच्या आघाडीच्या फळीने वारंवार आक्रमणे करून भारताच्या बचावफळीला दबावात आणले. त्यातच 50 व्या मिनिटाला शाहरिल शाबाह याने मलेशियासाठी पहिला गोल करून भारताची आघाडी 2-1 अशी कमी केली. मात्र अखेपर्यंत आपली आघाडी टिकवत भारतीय संघाने विजेतेपदावर नाव कोरले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा