भारतीयांसाठी ऐतिहासिक आहे आजची तारीख, धोनीनं केली होती कमाल

भारतीयांसाठी ऐतिहासिक आहे आजची तारीख, धोनीनं केली होती कमाल

धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं पहिला टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला 5 धावांनी पराभूत केलं होतं.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा जगातील एकमेव असा कर्णधार आहे ज्याच्या नेतृत्वाखाली आयसीसीच्या तीनही ट्रॉफी संघानं जिंकल्या आहेत. आजच्याच दिवशी 24 सप्टेंबर 2007 मध्ये भारतानं पहिला टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 5 धावांनी पराभूत करून वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. 2007 च्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पराभवानंतर भारतीय संघ धोनीच्या नेतृत्वाखाली टी20 वर्ल्ड कप खेळला होता. यात युवा खेळाडूंचा भरणा होता. तेव्हा कोणीही भारताला जेतेपदाचा दावेदार मानलं नव्हतं. मात्र धोनी ब्रिगेडनं पाकला पराभूत करून पहिला टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर पुन्हा भारताला टी20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.

भारत ज्या गटात होता त्यात स्कॉटलंड, पाकिस्तान हे संघ होते. स्कॉटलंडविरुद्धचा सामना पावसामुळं वाया गेला होता. पाकिस्तानविरुद्ध सुपर ओव्हरचा थरार भारतानं जिंकला. त्यानंतर सुपर सिक्समध्ये भारतानं प्रवेश केला. तिथं न्यूझीलंडविरुद्ध 10 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर उर्वरित दोन्ही सामने जिंकणं गरजेचं होतं. इंग्लंडविरुद्ध युवराजनं एका षटकात सलग 6 षटकार मारले होते. त्याच्या जोरावर भारतानं विजय मिळवला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्माचं अर्धशतक आणि आरपी सिंगच्या 4 विकेटच्या जोरावर विजयासह सेमीफायनल गाठली.

सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचं आव्हान भारतासमोर होतं. त्याआधी पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत करून फायनलमध्ये स्थान पक्क केलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारताच्या मदतीला पुन्हा युवराज सिंग धावून आला. त्यानं 30 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 70 धावांची खेळी केली होती. भारतानं ऑस्ट्रेलियाला 188 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर एस श्रीसंतच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत 173 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने ऑस्ट्रेलियाला 15 धावांनी पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला.

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्यापूर्वी भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागला दुखापत झाली. त्यामुळे तो सामन्याला मुकला. त्याच्या जागी युसुफ पठाणला संघात संधी मिळाली. भारताची आघाडीची फळी तेव्हा अपयशी ठरली होती. युसुफ पठाण, रॉबिन उथप्पा, धोनी यांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नव्हती. तर संपूर्ण स्पर्धा गाजवणाऱ्या युवराजला फक्त 14 धावाच काढता आल्या होत्या.

वाचा : सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या दिग्गज खेळाडूवर आता नियम तोडल्यामुळं झाली शिक्षा

आघाडीचे फलंदाज एका पाठोपाठ एक तंबूत परत जात होते. अशा वेळी गोंतम गंभीरने एक बाजू सांभाळली. त्याने रोहित शर्माच्या साथीने भारताचा डाव सावरला. गंभीरने 54 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्यानं 75 धावा केल्या होत्या. रोहितने 16 चेंडूत 30 धावा केल्या होत्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारतानं 20 षटकांत 5 बाद 157 धावा केल्या होत्या.

वाचा : भरमैदानात चाहतीनं काढली ऋषभ पंतची विकेट, सर्वांसमोर म्हणाली I Love You!

भारताने दिलेल्या 157 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कऱणाऱ्या पाकिस्तानला आरपी सिंगने दणका दिला. एकवेळ पाकिस्तानची अवस्था 6 बाद 77 अशी झाली होती. भारत सहज सामना जिंकेल असं वाटत होतं. पण मिसबाह उल हकने एका बाजूने हल्लाबोल केला. त्यानं तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून फटकेबाजी सुरू केली. त्यानं हरभजनच्या एकाच षटकात 3 षटकार मारले. यामुळं सामना रंगतदार झाला. अखेरच्या षटकांत भारताला एक विकेट तर पाकिस्तानला विजयासाठी 13 धावा हव्या होत्या.

हरभजनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी केल्यानं धोनीनं अखेरचं षटक टाकण्यासाठी चेंडू जोगिंदर शर्माच्या हाती सोपवला. त्यानं पहिलाच चेंडू वाइट टाकला. त्यानंतर निर्धाव चेंडू टाकला. दुसऱ्या चेंडूवर मिसबाहने षटकार मारला. तिसरा चेंडू मिसबाहने हवेत फटकावला पण त्याचा अंदाज चुकला. चेंडू हवेत उंच उडाला आणि श्रीसंतने सोपा झेल घेतला. यासह भारताने 5 धावांनी विजय मिळवत पहिल्या टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं.

कॅप्टन कोहली मैदानावरचा राडा पडला महागात, ICCने केली मोठी कारवाई

VIDEO : हेल्मेट घालून केली चोरी; विदेशी दारूसह 50000 लुटतानाची दृश्य CCTV मध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: MS Dhoni
First Published: Sep 24, 2019 09:24 AM IST

ताज्या बातम्या