मुंबई, 18 जानेवारी : आजपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेतील पहिला सामना हैद्राबादमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 12 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यासामन्यात भारताने दिलेले 350 धावांचे आव्हान पूर्ण करताना न्यूझीलंड संघाने कडवी झुंज दिली. न्यूझीलंडचा फलंदाज ब्रेसवेलने रोमहर्षक खेळी केली. परंतु तो भारताचं आव्हान पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यातील लढत अतिशय रोमांचक झाली. सर्वात आधी भारताच्या शुभमन गिलने तुफानी खेळी करून द्वीशतक ठोकले आणि भारताची धावसंख्या 349 पर्यंत नेली. त्यामुळे भारतीय संघ न्यूझीलंड समोर 350 धावांच आव्हान ठेवू शकला. न्यूझीलंडच्या मायकल ब्रेसवेलनं 140 धावांची खेळी करत जवळपास लक्ष्य गाठलंच होतं. पण अखेरच्या षटकात तो शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीचा शिकार ठरला त्यामुळे भारताने हा सामना 12 धावांनी जिंकला.
भारताने सुरुवातीला नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीपासून स्फोटक फलंदाजी सुरु करत भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली भागिदारी केली. परंतु केवळ 34 धावा करुन रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर विराटही स्वस्तात माघारी परतला. त्याच्या पाठोपाठ ईशान देखील संघासाठी चांगली खेळी करू शकला नाही. पण शुभमन गिलने भारतीय संघाची कमान सांभाळली. त्याने या सामन्यात विक्रमी द्विशतक केलं आणि वनडे सामन्यात भारतीय संघातील द्विशतक करणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला. त्यानं 149 चेंडूत 19 चौकार आणि 9 षटकार ठोकत 208 धावा केल्या ज्यामुळे भारताची धावसंख्या 349 पर्यंत पोहोचली.
भारताने दिलेलं 350 धावांच तगडं आव्हान पूर्ण करण्यासाठी न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरला पण सुरुवातीपासून त्यांचे फलंदाज बाद होऊ लागले. कॉन्वे 10 धावांवर बाद झाल्यावर इतर फलंदाज देखील स्वस्तात माघारी परतले. फिन अॅलननं 40 धावांची चांगली खेळी केली तेवढयात शार्दूल ठाकूरने त्याची शिकार केली. एकीकडे पटापट विकेट पडत असताना सातव्या विकेटसाठी मायकल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर यांनी एक अप्रतिम भागिदारी केली. पण सँटनर 57 धावा करुन बाद झाला. दुसऱ्या बाजूने षटकार चौकार ठोकत ब्रेसवेल लक्ष्याचा पाठलाग करतच होता. पण हार्दिक पांड्याने 49 वी ओव्हर अप्रतिम टाकत एक विकेट घेत केवळ 4 रन दिल्या. ज्यानंतर अखेरच्या षटकात 20 धावा न्यूझीलंडला हव्या होत्या. शार्दूल गोलंदाजीला आला पहिला बॉल सिक्स तर दुसरा वाईड टाकला. त्यानंतर मात्र शार्दूलनं अप्रतिम यॉर्कर टाकत ब्रेसवेलला बाद केले आणि भारताने हा सामना 12 धावांनी जिंकला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Rohit sharma, Team india, Virat kohli