ऑकलंड, 08 फेब्रुवारी: पहिल्या टी20 सामन्यात दारुण पराभवाची परतफेड भारताने दुसरा सामना 7 गडी राखून जिंकला. हिटमॅन रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडने दिलेलं 159 धावांचं आव्हान 19 षटकांत पूर्ण केलं. रोहित शर्माने 50 धावा केल्या. तो उंच फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. त्याच्यानंतर शिखर धवनही लगेच बाद झाला. त्याने 31 चेंडूत 30 धावा केल्या. विजय शंकर अवघ्या 14 धावा काढून तंबूत परतला. तो मिशेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंत यांनी डावाची सूत्रे हाती घेत भारताला विजय मिळवून दिला. पंतने 40 धावा केल्या तर धोनी 19 धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडने दमदार सुरूवात केली होती. मात्र पांड्याने एकाच षटकात 2 गडी बाद करत न्यूझीलंडच्या धावांना ब्रेक लावला. त्याने पुढच्याच षटकात कर्णधार केन विल्यम्सनला बाद करुन आणखी एक दणका दिला. भारताकडून कुणाल पांड्याने 3 तर खलील अहमदने 2 आणि हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या 1 बाद 40 धावा झाल्या होत्या. तेव्हा कर्णधार रोहित शर्माने कुणाल पांड्याच्या हाती चेंडू सोपवला. पांड्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत 3 गडी बाद केले. न्यूझीलंडकडून ग्रँडहोमने 50 आणि रॉस टेलरने 42 धावा केल्या.
तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून न्यूझीलंडने तर दुसरा सामना भारताने जिंकल्याने मालिकेत बरोबरी झाली आहे. पहिल्या सामन्यात भारताचा 80 धावांनी पराभव झाला. हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा