India vs West Indies : टीम इंडियाचा मालिका विजय! टॉप कामगिरी करत 67 धावांनी जिंकला सामना

India vs West Indies : टीम इंडियाचा मालिका विजय! टॉप कामगिरी करत 67 धावांनी जिंकला सामना

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियानं 67 धावांनी विजय मिळवल ही मालिका 2-1नं आपल्या खिशात घातली.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : मुंबईकरांनी आज खऱ्या अर्थानं चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहिला. मालिकेतील अखेरच्या सामन्यात टीम इंडियानं 67 धावांनी विजय मिळवत ही मालिका 2-1नं आपल्या खिशात घातली. भारतानं दिलेल्या 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पोलार्डनं 68 धावांची खेळी करत सामना जिंकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याची खेळी व्यर्थ ठरली. पोलार्ड आणि हेटमायर वगळता विडिंजचे फलंदाजी मैदानावर जास्त काळ टिकू शकले नाही. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत विडिंजला 173 धावांवर रोखले.

भारतानं दिलेल्या 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडिंजला सामन्याआधीच झटका बसला, सलामीवीर एव्हिन लेविस जखमी झाल्यामुळं मैदानात उतरू शकला नाही. शमी आणि भुवनेश्वर कुमार यांनी दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडले. मात्र हेटमायर (41) आणि पोलार्ड (68) यांनी भारताचा विजय लांबवला. मात्र कुलदीप यादवनं हेटमायरला माघारी धाडले. तर, 15व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारनं पोलार्डला माघारी धाडत भारताचा विजय निश्चित केला. भारताकडून भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि दीपक चाहरनं यांनी 2-2 विकेट घेतल्या.

तत्पूर्वी वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदाच फलंदाजी करताना दोन सामन्यात अयशस्वी ठरलेल्या रोहितची बॅट तळपली. केएल राहुल आणि रोहित शर्माच्या 135 धावांच्या भागीदारी केली. विराट, राहुल आणि रोहित शर्माच्या विक्रमी खेळीच्या जोरावर भारतानं 240 धावांची डोंगर उभा केला आहे. केएल राहुलनं 91 धावांची तुफानी खेळी केली. केवळ 55 चेंडूत 4 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीनं राहुलनं ही महत्त्वपूर्ण केली. त्यानं शेवटच्या 8 ओव्हरमध्ये विराट कोहलीसोबत 44 चेंडूत 95 धावांची भागीदारी केली. यात कॅप्टन कोहलीची आतषबाजी सर्वात चर्चेचा विषय ठरली. चौथ्या क्रमांकावर आलेल्या कोहलीनं 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत डावाच्या शेवटी 29 चेंडूत 70 धावा केल्या.

रोहितनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकार मारण्याचा विक्रमही केला. घरच्या मैदानावर रोहितनं पहिल्या चेंडूपासून विंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. 23 चेंडूत अर्धशतकी खेळी केल्यानंतर रोहितनं 6 चौकार, 5 षटकारांच्या मदतीनं 208.82च्या स्ट्राईक रेटनं 71 धावा केल्या. अखेर 12व्या ओव्हरमध्ये केसरिक विल्यम्सनं रोहितला बाद केले. रोहितला केएल राहुलनं योग्य साथ दिली. रोहित पाठोपाठ 29 चेंडूत केएल राहुलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराटनं ऋषभ पंतला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र विराटचा हा निर्णय सपशेल फसला. दुसऱ्याच चेंडूवर शुन्यावर ऋषभ पंत बाद झाला. त्यामुळं पुन्हा एकदा पंतवर टीका करण्यात येत आहे.

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

वेस्ट इंडिज : किरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऑलीन, ब्रँडन किंग, दिनेश रामदिन, शेल्डन कॉट्रिएल, एव्हिन लेविस, शेर्फानी रुदरफोर्ड, शिम्रॉन हेटमायर, ख्ॉरी पीएरी, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, हेडन वॉल्श ज्युनिअर, कीमो पॉल, केसरिक विल्यम्स.

Published by: Priyanka Gawde
First published: December 11, 2019, 6:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading