IND vs WI : मित्र होणार वैरी! पहिल्या टी-20 सामन्यासाठी ‘या’ खेळाडूंना विराट देणार संघात जागा

IND vs WI : मित्र होणार वैरी! पहिल्या टी-20 सामन्यासाठी ‘या’ खेळाडूंना विराट देणार संघात जागा

भारतीय संघात होऊ शकतो एक बदल, हा खेळाडू उतरणार सलामीला.

  • Share this:

हैदराबाद, 06 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात आज पहिला टी-20 सामना होणार आहे. सायंकाळी 7 वाजता हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर हा सामना होणार आहे. ही मालिका पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. मात्र या सामन्यात युवा खेळाडूंना जास्त संधी दिल्या जाऊ शकतात.

याआधी भारतानं बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका जिंकली होती. त्यामुळं वेस्ट इंडिजविरुद्ध संघ निवडताना फक्त एक बदल केला जाऊ शकतो. भारतीय संघात विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार, या खेळाडूंचा समावेश आहे. मात्र कोणत्या 11 खेळाडूंना संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे असेल.

सलामीवीर फलंदाज – रोहित शर्मा, केएल राहुल

वर्ल्ड कपपासून रोहित सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. बांगलादेशविरुद्ध विराटच्या अनुपस्थितीत रोहितनं भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. यात त्यानं दुसऱ्या टी20 सामन्यात मॅच विनिंग अशी 85 धावांची खेळी केली होती. त्यामुळे संघातील त्याचे स्थान अटळ आहे. दरम्यान शिखर धवन दुखापतीमुळे मालिकेबाहेर पडला आहे. धवनच्या जागी संजू सॅमसनला संघात जागा मिळाली असली तरी, केएल राहुल या सामन्यात सलामीला उतरू शकतो. राहुलनं नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्ये 8 सामन्यात 52.16 च्या सरासरीने 313 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 3 अर्धशतकांचा समावेश आहे.

मधली फळी – विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे

बांगलादेशविरुद्ध विश्रांती देण्यात आलेला कॅप्टन कोहली आता कमबॅक करणार आहे. त्यामुळं तिसऱ्या क्रमांकावर कोहलीचे स्थान अटळ असेल. तर, श्रेयस अय्यरनं बांगलादेशविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे 11 जणांच्या भारतीय संघात कायम राहण्याची दाट शक्यता आहे. तर, मनिष पांडेही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात तमिळनाडूविरुद्ध नाबाद 60 धावांची खेळी केली होती. तर, विकेटकीपर म्हणून ऋषभ पंतला संधी देण्यात येईल, असे संकेत विराट कोहलीनं दिले होते.

अष्टपैलू क्रिकेटपटू – शिवम दुबे/रविंद्र जडेजा

अष्टपैलू म्हणून संघाकडे दोन पर्याय आहेत. शिवम दुबेला बांगलादेश विरुद्धच्या टी20 मालिकेतून पहिल्यांदा भारताच्या संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यानेही गोलंदाजीत चांगले प्रदर्शन केले. त्याचबरोबर जडेजाही भारतीय टी20 संघातही परतला आहे. त्यामुळे त्यालाही संधी मिळू शकते.

गोलंदाज – युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, दीपक चाहर

गोलंदाजीमध्ये दोन जलद गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज असेच समीकरण असू शकते. जडेजाच्या जोडीला चहलला संधी मिळू शकते. याबरोबरच शमीनं आपल्य कामगिरीनं सर्वांना प्रभावित केले आहे. तसेच बांगलादेश विरुद्धचा हॅट्रीक हिरो दीपक चाहरचे स्थान निश्चित आहे. चाहरने भारताबरोबरच देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. भुवनेश्वर कुमार बऱ्याच कालावधीनंतर कमबॅक करू शकतो.

असा असेल अंतिम 11 खेळाडूंचा संघ- रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार.

असा आहे भारत-वेस्ट इंडिज दौरा

6 डिसेंबर 2019 - पहिला T20I, मुंबई

8 डिसेंबर 2019 - दुसरा T20I, तिरुवनंतपुरम

11 डिसेंबर 2019 - तिसरा T20I, हैदराबाद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2019 08:45 AM IST

ताज्या बातम्या