Home /News /sport /

IND vs SL : 5 भारतीय खेळाडूंसाठी श्रीलंका दौरा महत्त्वाचा, अन्यथा करियर धोक्यात

IND vs SL : 5 भारतीय खेळाडूंसाठी श्रीलंका दौरा महत्त्वाचा, अन्यथा करियर धोक्यात

शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वात टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर (India vs Sri Lanka) गेली आहे. या दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे.

    कोलंबो, 12 जुलै: शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वात टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर (India vs Sri Lanka) गेली आहे. या दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. 18 जुलैलला वनडे सीरिजपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. टीमचे वरिष्ठ खेळाडू इंग्लंडमध्ये असल्यामुळे टीम इंडियामध्ये नवोदितांना संधी देण्यात आली आहे. टीममध्ये लेग स्पिनर युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यासह काही दिग्गजांचाही समावेश आहे. या खेळाडूंसाठी हा दौरा महत्त्वाचा आहे. श्रीलंकेमध्ये चांगली कामगिरी केली नाही, तर या खेळाडूंचं करियर धोक्यात येऊ शकतं. युझवेंद्र चहल: लेग स्पिनर असलेल्या युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) वनडे करियरमध्ये 54 सामने खेळून 92 विकेट घेतल्या आहेत. अखेरच्या 10 मॅचमध्ये चहलला 14 विकेट मिळाल्या, पण त्याचा इकोनॉमी रेट खराब राहिला. टी-20 मध्येही त्याच्या कामगिरीमध्ये घसरण होत आहे. 2021 साली चहलला एकही वनडे खेळण्याची संधी मिळाली नाही. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजच्या पहिल्या दोन मॅचमध्ये चहलने बऱ्याच रन दिल्या, त्यामुळे उरलेल्या दोन मॅचमध्ये लेग स्पिनर राहुल चहर खेळला. चहरने त्याच्या बॉलिंगने प्रभावित केलं. श्रीलंका दौऱ्यासाठीही राहुल चहरची टीममध्ये निवड झाली आहे. याशिवाय मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीही टीममध्ये आहे. कुलदीप यादव: डावखुरा स्पिनर कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) 63 वनडे सामन्यांमध्ये 105 विकेट घेतल्या आहेत. यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या दोन वनडेमध्ये त्याला संधी मिळाली, पण त्याला एकही विकेट घेता आली नाही. अखेरच्या 10 मॅचमध्ये कुलदीपला फक्त 9 विकेट घेता आल्या. खराब कामगिरीमुळे त्याला या मोसमात केकेआरने एकही आयपीएल मॅच खेळवली नाही. मनिष पांडे: मधल्या फळीतला बॅट्समन असलेल्या मनिष पांडे (Manish Pandey) याने 2015 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 6 वर्षांच्या या करियरमध्ये पांडेला 26 वनडेमध्ये आणि 39 टी-20 मध्येच भारताकडून खेळता आलं. मनिष पांडेच्या कामगिरीमध्ये सातत्याचा अभावही आहे. वनडेमध्ये त्याने एक शतक आणि दोन अर्धशतक आणि टी-20 मध्ये तीन अर्धशतकं केली आहेत. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन हेदेखील आता मधल्या फळीसाठी मजबूत पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. संजू सॅमसन : संजू सॅमसन (Sanju Samson) याला आयपीएलच्या या मोसमात राजस्थान रॉयल्सचं कर्णधार करण्यात आलं, पण त्याच्या कामगिरीतही सातत्य दिसलं नाही. केएल राहुल मर्यादित ओव्हरमध्ये विकेट कीपर म्हणून खेळत आहे, सोबतच इशान किशननेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटची चांगली सुरुवात केली आहे, त्यामुळे संजू सॅमसनला आता मिळतील तेवढ्या संधींचं सोनं करावं लागणार आहे. संजू सॅमसनला आतापर्यंत फक्त 7 टी-20 खेळण्याची संधी मिळाली आहे. दीपक चहर : फास्ट बॉलर दीपक चहरने (Deepak Chahar) टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये चांगली सुरुवात केली होती, पण यानंतर तो टीमबाहेर गेला. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये तो खेळला नाही. 15 टी-20 मध्ये त्याने 18 विकेट घेतल्या, तर 3 वनडेमध्ये त्याला 2 विकेट मिळाल्या आहेत. बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज यांच्यासारखे फास्ट बॉलर असताना चहरला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India Vs Sri lanka, Team india

    पुढील बातम्या