कोलंबो, 21 जुलै : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) रोमांचक विजय झाला. 276 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था 193/7 अशी झाली, पण दीपक चहर (Deepak Chahar) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांनी नाबाद पार्टनरशीप करत भारताला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. दीपक चहरने नाबाद 69 रन तर भुवनेश्वर कुमारने नाबाद 19 रन केले. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 84 रनची पार्टनरशीप केल्यामुळे भारताने सीरिजमध्ये 2-0 ने विजयी आघाडी घेतली.
या सामन्यात दीपक चहरला भुवनेश्वर कुमारच्या आधी बॅटिंगला पाठवण्याचा निर्णय राहुल द्रविडचा (Rahul Dravid) होता. खुद्द भुवनेश्वर कुमारने मॅच संपल्यानंतर याचा खुलासा केला. 'आमचं लक्ष्य अंतिम ओव्हर आणि शेवटच्या बॉलपर्यंत खेळण्याचं होतं, त्यामुळे आम्हाला सामना अखेरच्या क्षणापर्यंत न्यायचा होता. दीपकने ज्या पद्धतीने बॅटिंग केली ती शानदार होती. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात दीपक भारत ए कडून खेळला आहे आणि त्याने तिकडेही रन केल्या आहेत. त्यामुळे चहर बॅटिंग करू शकतो, हे द्रविडला माहिती आहे. त्याला वरच्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्याचा निर्णय द्रविडचाच होता,' असं भुवनेश्वर कुमार म्हणाला.
दीपक चहरने बॅटिंगमध्येही स्वत:ला सिद्ध केलं. तो बॅटिंग करू शकतो हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये अनेकवेळा बॅटिंग केली आहे, अशी प्रतिक्रिया भुवनेश्वर कुमारने दिली.
'मॅच शेवटपर्यंत न्यायची एवढंच आम्ही बोलत होतो. आपण जिंकू शकतो, हे आम्ही कधीच बोललो नाही. जेव्हा तीन रनची गरज होती तेव्हाही आम्ही एकावेळी एक बॉलबाबतच बोलत होतो. दीपकने कधीच रिक्वायर रन रेट 6 च्या वर जाऊन दिला नाही. त्याने बहुतेक शॉट धोका न पत्करता मारले. आपण जिंकणार किंवा हरणार आहोत, याबाबत आम्ही विचारही करत नव्हतो. परिस्थितीनुसार आम्ही प्रत्येक बॉलवर लक्ष देऊन खेळत होतो,' असं वक्तव्य भुवनेश्वर कुमारने केलं.
'जेव्हा तुम्ही बाहेर बसून मॅच बघत असता तेव्हा दबावात येऊ शकता. जेव्हा मी बॅटिंग करत होतो, तेव्हा मी राहुल द्रविडला बघितलं नाही, पण जेव्हा तो ड्रेसिंग रूममधून खाली आला तेव्हा आम्ही त्याला शुभेच्छा दिल्या. पाच-सहा विकेट गमावल्यानंतरही दीपकने जशी बॅटिंग केली, ते पाहून द्रविड खूश होता,' असं भुवनेश्वर कुमारने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India Vs Sri lanka, Rahul dravid