Home /News /sport /

IND vs SL : राहुल द्रविडसाठी पहिल्याच दौऱ्यात डोकेदुखी ठरणार टीम इंडिया!

IND vs SL : राहुल द्रविडसाठी पहिल्याच दौऱ्यात डोकेदुखी ठरणार टीम इंडिया!

शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वात भारतीय टीम जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यात भारतीय टीम तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. या दौऱ्यासाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) टीमचा मुख्य प्रशिक्षक असेल.

    मुंबई, 12 जून : शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वात भारतीय टीम जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यात भारतीय टीम तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. या दौऱ्यासाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) टीमचा मुख्य प्रशिक्षक असेल. पण भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या (Aakash Chopra) मते राहुल द्रविडसाठी हा दौरा डोकेदुखी ठरू शकतो. श्रीलंका दौऱ्यासाठी 20 खेळाडूंच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 4 ओपनर, 6 स्पिनर आणि 4 फास्ट बॉलरना संधी मिळाली आहे. 6 सामन्यांसाठी 20 जणांची निवड करण्यात आली आहे, पण त्यांना मॅच खेळवणं द्रविड आणि धवनसाठी डोकेदुखी ठरेल, असं आकाश चोप्रा म्हणाला. 'टीम इंडियामध्ये नितीश राणा, वरुण चक्रवर्ती, कृष्णप्पा गौतम, चेतन सकारिया, ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पडिक्कल या 6 अनकॅप खेळाडूंना निवडण्यात आलं. आयपीएलमध्ये राणा, चक्रवर्ती, गायकवाड आणि पडिक्कल यांनी शानदार कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यांना संधी मिळू शकते. जयदेव आणि तेवतियाला बाहेर केल्यामुळे मी हैराण झालो आहे. मागच्यावेळी तेवतियाला टीममध्ये घेतलं, पण संधी न देताच त्याला बाहेर काढण्यात आलं, हा त्याच्यावर अन्याय आहे,' असं आकाश चोप्रा म्हणाला. 'टीममध्ये चार ओपनर आहेत, यात शिखर धवनचं खेळणं निश्चित आहे. याशिवाय पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड यांनाही संधी देण्यात आली आहे. आता टीमपुढे कोणाला खेळवायचं, हा प्रश्न असेल. शिखर धवनसोबत पृथ्वी शॉ ओपनिंगसाठीची पहिली पसंत असेल. शॉने खराब कामगिरी केली, तर पडिक्कलला खेळवलं जाईल, तर गायकवाडचा नंबर सगळ्यात शेवटी येईल,' असं भाकीत आकाश चोप्राने केलं. 'श्रीलंका दौऱ्यासाठी 6 स्पिनरची निवड करण्यात आली आहे, पण यापैकी जास्तीत जास्त तिघांनाच संधी मिळेल. राहुल चहर, युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, कृष्णप्पा गौतम या स्पिनरची निवड करण्यात आली आहे. अनेकवेळा तीन स्पिनर खेळवणंही मुश्कील असतं. यात कृणालची निवड निश्चित मानली जात आहे, कारण तो फिनिशर आहे. याशिवाय चहलला खेळवलं जाईल. यानंतर एका स्पिनरचा विचार केला जाऊ शकतो, त्यामुळे इतरांना संधी मिळणं मुश्कील आहे,' असं वक्तव्य आकाश चोप्राने केलं. 'निवड समितीने सगळे टॉप ऑर्डरचे बॅट्समन निवडले, हे सगळे तिसऱ्या क्रमांकापर्यंत बॅटिंग करू शकतात, मग उरलेल्या क्रमांकावर कोण बॅटिंग करणार? हार्दिक पांड्या आता वरिष्ठ खेळाडू आहे, त्यामुळे त्याला चौथ्या क्रमांकावर पाठवलं जाऊ शकतं. यानंतर इशान किशन, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, नितीश राणा खालच्या क्रमांकावर बॅटिंग करू शकतील का?' असा सवाल आकाश चोप्राने उपस्थित केला आहे. 'पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर कृणालला संधी द्यावी लागेल, मग गौतमलाही खेळवावं लागेल. मग स्पिनर म्हणून कोणाला खेळवलं जाईल? जर एवढी मोठी टीम निवडायची होती, तर एका फास्ट बॉलरला संधी द्यायला पाहिजे होती. टीममध्ये दोन स्पिनर जास्त आहेत, तसंच सगळे बॅट्समन टॉप ऑर्डरमधले आहेत. निवड समितीने जर कठोर निर्णय घेतला असता तर राहुल द्रविड आणि शिखर धवनचं काम थोडं सोपं झालं असतं,' असं आकाश चोप्रा म्हणाला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, India Vs Sri lanka, Rahul dravid, Shikhar dhawan, Team india

    पुढील बातम्या