टीम इंडियाला पुण्यात इतिहास घडवण्याची संधी, विजयासह करणार विश्वविक्रम?

टीम इंडियाला पुण्यात इतिहास घडवण्याची संधी, विजयासह करणार विश्वविक्रम?

पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजयासाठी भारतीय संघ उत्सुक असेल. यामध्ये विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियाने दोन वेळा केलेल्या कामगिरीवर भारतीय संघ भारी पडणार आहे.

  • Share this:

पुणे, 09 ऑक्टोबर : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. त्यानंतर दुसरा सामना पुण्यात होणार असून हा सामना जिंकून मालिकेत विजय आघाडी घेण्यासाठी भारत उत्सुक असेल. 10 ऑक्टोबर पासून हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होणार आहे. पहिल्या कसोटीत फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत भारताने जबरदस्त कामगिरी केली होती.

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी विक्रमी भागिदारी केली होती. रोहितने दोन्ही डावात शतक झळकावलं. मयंकने पहिल्या डावात 215 धावांची खेळी केली होती. गोलंदाजीत आर अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी कमाल केली.

पुण्यातील कसोटी सामन्यात आघाडीच्या फळीची जबाबदारी रोहित आणि मयंक यांच्याकडेच असेल. तर मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे असतील. हनुमा विहारी आणि ऋद्धिमान साहा खालच्या क्रमांकावर खेळतील. यामध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे.

भारतीय गोलंदाजांचा धसका दक्षिण आफ्रिकेनं घेतला आहे. दोन्ही डावात आफ्रिकेच्या सर्व फलंदाजांना बाद करण्यात भारतानं यश मिळवलं. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी विशाखापट्टणमच्या कसोटीत मोक्याच्या क्षणी दक्षिण आफ्रिकेला दणका दिला. तर दुसऱ्या बाजूने रविचंद्रन अश्विन आणि जडेजा यांच्या फिरकीच्या जाळ्यात फलंदाज अडकले. यामुळे गोलंदाजीतही बदल होण्याची शक्यता नाही.

दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेण्याच्या इराद्याने भारत मैदानात उतरेल. भारताने घरच्या मैदानावर खेळताना 10 कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी भारताकडे आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने दोन वेळा घरच्या मैदानावर सलग 10 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्यानंतर भारताने 10 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकून भारत विश्वविक्रम करू शकतो. भारताने फेब्रुवारी 2013 पासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.

सध्या भारताचे दोन महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे बाहेर आहेत. जसप्रीत बुमराह आणि हार्दीक पांड्या दोघांवरही सध्या उपचार सुरू आहेत. तर यष्टीरक्षक ऋषभ पंतऐवजी साहाला संधी देण्यात आली आहे.

संभाव्य संघ : रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋद्धिमान साहा, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी

आईच्या कुशीतून 8 महिन्यांच्या बाळाला पळवलं, धक्कादायक CCTV VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: October 9, 2019, 11:47 AM IST
Tags:

ताज्या बातम्या