सेंच्युरियन, 27 डिसेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यामध्ये सेंच्युरियनमध्ये पहिली टेस्ट मॅच सुरू आहे, पण याच सेंच्युरियनमध्ये 20 वर्षांपूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिकेतली टेस्ट अनधिकृत (Unofficial Test) घोषित करण्यात आली होती. या टेस्ट मॅचपूर्वी झालेल्या घटनांचे पडसाद भारताच्या संसदेतही उमटले होते, एवढंच नाही तर भारतीय क्रिकेट रसिकांनी रस्त्यावर आंदोलनंही केली होती. 23-27 नोव्हेंबर दरम्यानची सेंच्युरियन टेस्ट अनधिकृत होण्यामागे त्याआधीच्या टेस्ट मॅचची पार्श्वभूमी आहे.
16-20 नोव्हेंबरदरम्यान पोर्ट एलिझाबेथमध्ये झालेल्या टेस्टवेळी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि त्या सामन्याचे मॅच रेफ्री माईक डेनीस (Match Referee Mike Denness) यांनी भारताच्या तब्बल 6 खेळाडूंचं निलंबन केलं होतं. हे निलंबन करताना डेनीस यांनी वेगवेगळी कारणं दिली होती. भारतीय क्रिकेटमधला हा सगळ्यात मोठ्या वादापैकी एक आहे.
कोणाचं निलंबन?
सचिन तेंडुलकर : बॉल कुरतडल्याप्रकरणी एका टेस्ट मॅचसाठी निलंबन
वीरेंद्र सेहवाग : जास्त अपील केल्यामुळे एका टेस्ट मॅचची बंदी
सौरव गांगुली : टीमच्या वागणुकीवर लगाम न घातल्यामुळे एक टेस्ट आणि 2 वनडेसाठी निलंबन
हरभजन सिंग : जास्त अपील केल्यामुळे एका टेस्ट मॅचची बंदी
शिव सुंदर दास : जास्त अपील केल्यामुळे एका टेस्ट मॅचची बंदी
दीप दास गुप्ता : जास्त अपील केल्यामुळे एका टेस्ट मॅचची बंदी
भारताच्या एवढ्या खेळाडूंचं निलंबन झाल्यानंतर वाद होणं साहजीकच होतं. टीम इंडिया, बीसीसीआय, क्रिकेट साऊथ आफ्रिका आणि आयसीसी यांच्या अधिकाऱ्यांमध्ये या वादावर चर्चा झाली, अखेर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली सेंच्युरियनमधली तिसरी टेस्ट अनधिकृत घोषित करण्यात आली. सेहवागला मात्र एका टेस्ट मॅचच्या निलंबनाची शिक्षा भोगावी लागली. सेंच्युरियनमध्ये झालेल्या या अनधिकृत टेस्टमध्ये सचिन, शिव सुंदर दास, दीप दास गुप्ता आणि हरभजन सिंग खेळले होते. गांगुली आणि सेहवाग मात्र मैदानात उतरले नव्हते. या अनधिकृत सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा इनिंग आणि 73 रनने विजय झाला.
मॅच रेफ्री डेनीस यांच्या या निर्णयामुळे भारतामध्ये मोठा वाद झाला. डेनीस यांच्या पुतळ्याच भारतात दहन करण्यात आलं, तसंच संसदेमध्येही हा मुद्दा उचलण्यात आला होता. वादानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रवी शास्त्री यांनीही माईक डेनीस यांना बोचरे सवाल विचारले, पण त्यांनी कोणत्याच प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत. डेनीस यांना उत्तरंच द्यायची नसतील, तर ते इकडे काय करतायत? असं रवी शास्त्रींनी त्या पत्रकार परिषदेमध्ये विचारलं.
वाद वाढल्यानंतर बीसीसीआयनेही डेनीस यांना तिसऱ्या टेस्टमधून डच्चू दिला नाही, तर दक्षिण आफ्रिका दौरा रद्द करण्याची धमकी दिली होती. आयसीसीने डेनीस यांना पाठिंबा दिला, तर क्रिकेट दक्षिण आफ्रिका बीसीसीआयच्या बाजूने उभी राहिली. तिसऱ्या टेस्टसाठी डेनीस यांना डच्चू देण्यात आला, याशिवाय त्यांना स्टेडियममध्येही प्रवेश दिला गेला नाही. डेनीस यांना डच्चू दिल्यानंतर आयसीसीने ही टेस्ट अनधिकृत घोषित केली, त्यामुळे पहिल्या दोन टेस्ट मॅचच्या निकालानंतर दक्षिण आफ्रिकेने सीरिज 1-0 ने जिंकली.
आयसीसीने सेहवागवरची एका मॅचची बंदी कायम ठेवली, तर तेंडुलकर आणि गांगुली यांचं निलंबन मागे घेतलं. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर इंग्लंडचा भारत दौराही अडचणीत सापडला होता, कारण सेहवागची टीम इंडियात निवड झाली होती. सेहवाग जर पहिली टेस्ट खेळला तर भारत-इंग्लंड टेस्टही अनधिकृत घोषित करण्यात येईल, असा इशारा आयसीसीने दिला. यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्ड, आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात चर्चा झाली आणि सेहवागला पहिल्या टेस्टमध्ये बाहेर ठेवण्यात आलं.
या वादानंतर माईक डेनीस फक्त दोन टेस्ट आणि तीन वनडेमध्ये रेफ्री होते. जानेवारी आणि फेब्रुवारी 2002 साली पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात शारजाहमध्ये झालेल्या सीरिजमध्ये डेनीस रेफ्री म्हणून अखेरचे दिसले. या वादावर पडदा टाकण्यासाठी आयसीसीच्या डिस्प्युट रिझोल्यूशन कमिटीने 6-7 जून 2002 ला बैठक बोलावली, पण तब्येतीचं कारण देत डेनीस या बैठकीला आले नाहीत. यानंतर या प्रकरणाची कधीच सुनावणी झाली नाही. डेनीस यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे बीसीसीआयनेदेखील हे प्रकरण पुढे वाढवलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: South africa, Team india