मुंबई, 8 नोव्हेंबर : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातल्या क्रिकेट सामन्यांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. काहीच दिवसांपूर्वी टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) या दोन टीम आमने-सामने होत्या. या सामन्यात टीम इंडियाचा 10 विकेटने दारूण पराभव झाला. पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताला वर्ल्ड कप मॅचमध्ये हरवलं. आता चाहते या दोन्ही देशांमध्ये पुन्हा कधी मॅच होतील, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पुढच्या काही काळात या दोन्ही टीम एक-दोन नाही तर चारवेळा एकमेकांना भिडण्याची शक्यता आहे.
युएईमध्ये सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलच्या रेसमधून टीम इंडिया आधीच बाहेर झाली आहे. ग्रुप-2 मधून पाकिस्तान आणि न्यूझीलंड सेमी फायनलला पोहोचले आहेत, त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात फायनल होईल, अशी आशा करणाऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. भारत आज म्हणजेच 8 नोव्हेंबरला नामिबियाविरुद्ध या वर्ल्ड कपचा आपला अखेरचा सामना खेळणार आहे. विराट कोहलीसाठी टी-20 टीमचा कर्णधार म्हणून ही अखेरची मॅच असणार आहे.
पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 साली श्रीलंकेमध्ये आशिया कपचं (Asia Cup) आयोजन होणार आहे. यात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा टी-20 मॅच खेळताना दिसतील. 2018 साली अखेरच्या आशिया कपचं आयोजन करण्यात आलं होतं, तेव्हा भारताने फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव केला होता. त्या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता, तेव्हा रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताचा 9 विकेटने विजय झाला होता.
आता 2 वर्षांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा वनडे सामना होण्याची शक्यता आहे. भारतीय टीम 2023 साली पाकिस्तान दौऱ्यावर जाऊ शकते. आशियाई क्रिकेट काऊन्सिलच्या बैठकीमध्ये 2023 सालच्या आशिया कपचं आयोजन पाकिस्तानला देण्यात आलं आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तान आता घरचे सामने न्यूट्रल ठिकाणी न खेळता पाकिस्तानमध्येच आयोजित करेल, असं पीसीबीने आधीच स्पष्ट केलं आहे. बीसीसीआयनेही असा निर्णय झाल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे 2023 साली आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात वनडे सामना होईल.
आशिया कपनंतर लगेचच भारतात वनडे वर्ल्ड कप (World Cup 2023) होणार आहे. या वर्ल्ड कपमध्येही भारत-पाकिस्तानचा सामना होण्याची शक्यता आहे. तसंच पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, तेव्हाही भारत-पाकिस्तान यांच्यात मुकाबला रंगेल, हे निश्चित मानलं जात आहे. हा टी-20 वर्ल्ड कप ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 साली होणार आहे.
म्हणजेच पुढच्या तीन वर्षांमध्ये दोन आशिया कप, एक टी-20 वर्ल्ड कप आणि वनडे वर्ल्ड कप अशा कमीत कमी 4 वेळा तरी भारत-पाकिस्तान यांचातला मुकाबला चाहत्यांना बघायला मिळू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs Pakistan, T20 world cup, Team india