अहमदाबाद, 16 मार्च : यंदाच्या वर्षी भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) बऱ्याच खेळाडूंना संधी देत आहे. वर्ल्ड कपसाठी टीम संतुलित व्हावी, यासाठी टीममध्ये अनेक युवा खेळाडूंना खेळवण्यात येत आहे. पण टीम इंडियामध्ये धडाक्यात आगमन करणाऱ्या लेग स्पिनर युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) मागच्या 15 महिन्यांपासून संघर्ष करावा लागत आहे, त्यामुळे त्याचं भारतीय टीममधलं स्थान धोक्यात आलं आहे. टी-20 क्रिकेटमध्ये भरपूर विकेट घेणाऱ्या चहलला आता विकेट घेण्यात अपयश येत आहे.
मागच्या 15 महिन्यांमध्ये चहलची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्याला विकेट घेता आल्या नाहीच, पण रन रोखण्यातही त्याला अपयश आलं, त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपमध्ये चहलची निवड होणार का नाही? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मागच्या 15 महिन्यांमध्ये चहलला टी-20 क्रिकेटमध्ये फक्त 9 विकेट घेता आल्या आहेत. या कालावधीमध्ये त्याचा इकोनॉमी रेटही जास्त राहिला. चहलने जानेवारी 2020च्या आधी 36 टी-20 मॅचमध्ये 21.9 च्या सरासरीने 52 विकेट घेतल्या. पण यानंतरच्या 11 मॅचमध्ये त्याला 9 विकेटच मिळाल्या, तसंच त्याची बॉलिंग सरासरीही 43.88 झाली आणि त्याने 9.3 च्या इकोनॉमी रेटने रन दिले.
दुसरीकडे वनडे क्रिकेटमध्ये चहलने जानेवारी 2020 आधी 50 मॅचमध्ये 85 विकेट घेतल्या होत्या. पण यानंतरच्या 4 मॅचमध्ये त्याला 7 विकेटच घेता आल्या आणि त्याचा इकोनॉमी रेटही 6.79 एवढा राहिला.
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्येही चहलला खास कामगिरी करता आली नाही. लेग स्पिनर म्हणून चहलला आता राहुल चहरचा पर्यायही उपलब्ध आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england, T20 cricket, Yuzvendra Chahal