पुणे, 26 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या वनडे सीरिजमधल्या दुसऱ्या मॅचला पुण्यात सुरूवात झाली आहे. याआधी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताचा 66 रननी विजय झाला होता. आता या मॅचमध्येही विजय मिळवत सीरिज जिंकण्याची संधी विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमपुढे आहे. याआधी टेस्ट सीरिजमध्ये भारताचा 3-1 ने तर टी-20 सीरिजमध्ये 3-2 ने विजय झाला होता. टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे, यानंतर आता वनडे सीरिजमध्येही भारताला पहिला क्रमांक गाठण्याची संधी आहे.
वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी टीम इंडियाला सीरिजच्या उरलेल्या दोन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. सीरिजच्या तिन्ही मॅच जिंकल्या तर भारताला 3 रेटिंग पॉईंट्सचा फायदा होईल, तसंच ते 120 पॉईंट्सवर पोहोचतील, त्यामुळे इंग्लंडला पहिला क्रमांक गमवावा लागेल.
तिन्ही मॅच गमावल्या तर इंग्लंडचं 4 रेटिंग पॉईंट्सचं नुकसान होईल आणि त्यांच्या खात्यात 119 पॉईंट्स होतील. असं झाल्यास इंग्लंड आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड यांच्यात फक्त 2 पॉईंट्सचा फरक येईल.
भारताचं इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानातलं रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. दोन्ही देशांमध्ये भारतात 9 वनडे सीरिज झाल्या आहेत, यातल्या भारताने 6 तर इंग्लंडने फक्त एक सीरिज जिंकली आहे. उरलेल्या दोन्ही सीरिज बरोबरीत सुटल्या. इंग्लंडने भारतात शेवटची सीरिज 1984 साली जिंकली होती. त्यावेळी इंग्लंडचा 5 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये 4-1 ने विजय झाला होता. दोन्ही टीम भारतात 4 वर्षांनंतर वनडे सीरिज खेळत आहेत. याआधी 2017 साली झालेल्या वनडे सीरिजमध्ये भारताने इंग्लंडचा 2-1 ने पराभव केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Icc, India vs england, Virat kohli