पुणे, 26 मार्च : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) शतकाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये (India vs England) विराट 66 रन करून आऊट झाला, पण या मॅचमध्ये विराटने दोन विक्रम केले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करताना 10 हजार रन पूर्ण केले आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉण्टिंगनंतर (Ricky Pointing) हा विक्रम करणारा विराट दुसरा खेळाडू बनला आहे. वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक रन करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉण्टिंगच्या नावावर आहे. पॉण्टिंगने या क्रमांकावर 12,662 रन केले आहेत. रिकी पॉण्टिंगने 335 इनिंगमध्ये हा रेकॉर्ड केला, यात पॉण्टिंगने 29 शतकंही केली. विराटला 10 हजार रनचा टप्पा ओलांडायला 192 इनिंग लागल्या. आता या क्रमांकावर त्याच्या नावावर 10,046 रन आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट तिसऱ्या तर कुमार संगकारा (9747) तिसऱ्या क्रमांकावर, जॅक कॅलिस (7774) चौथ्या क्रमांकावर आहे. संगकाराने 243 आणि जॅक कॅलिसने 204 मॅचमध्ये एवढ्या रन केल्या आहेत.
विराटने वनडेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर 62 च्या सरासरीने बॅटिंग करत 36 शतकं केली आहेत, तर उरलेली 7 शतकं त्याने तीनपेक्षा खालच्या क्रमांकावर झळकावली. 2012 नंतर विराट याच क्रमांकावर बॅटिंग करत आहे.
स्मिथला टाकलं मागे
दुसरीकडे विराटने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथला (Grame Smith) मागे टाकलं आहे. कर्णधार असताना स्मिथने 150 वनडे मॅचमध्ये 5,416 रन केले होते. स्मिथचं हे रेकॉर्ड मोडण्यासाठी विराटला 41 रनची गरज होती. 66 रनची खेळी करून विराटने स्मिथला मागे टाकलं.
कर्णधार म्हणून सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये रिकी पॉण्टिंग पहिल्या क्रमांकावर आहे. कर्णधार असताना पॉण्टिंगने 234 वनडेमध्ये 8497 रन केल्या. तर धोनी 200 वनडेमध्ये 6,641 रन करत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर स्टीफन फ्लेमिंग आणि अर्जुन रणतुंगा आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.