Home /News /sport /

IND vs ENG : विराट-रोहितची जोडी करून देते सचिन-सेहवागची आठवण!

IND vs ENG : विराट-रोहितची जोडी करून देते सचिन-सेहवागची आठवण!

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 मॅचमध्ये भारताचा (India vs England) 36 रनने विजय झाला, याचसोबत टीम इंडियाने ही सीरिजही 3-2ने खिशात टाकली. या मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) ओपनिंगला आला.

    अहमदाबाद, 21 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 मॅचमध्ये भारताचा (India vs England) 36 रनने विजय झाला, याचसोबत टीम इंडियाने ही सीरिजही 3-2ने खिशात टाकली. इंग्लंडविरुद्धच्या या सीरिजमध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) टीम इंडियाची प्रयोगशाळा केली होती. पाचव्या टी-20 मध्येही असेच प्रयोग पाहायला मिळाले. या मॅचमध्ये विराट रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) ओपनिंगला आला. यानंतर या दोघांनी 9 ओव्हरमध्येच 94 रन केले. विराट 80 रनवर नाबाद राहिला तर रोहितने 64 रन केले. विराट कोहलीच्या या निर्णयाचं त्याच्या टीकाकारांनीही कौतुक केलं. मागच्या दोन महिन्यांमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने (Michael Vaughan) एक डझन पेक्षा जास्त ट्वीट केली, यामध्ये विराटला लक्ष्य करण्यात आलं. पण यावेळी मात्र मायकल वॉनने विराटचं कौतुक केलं. 'विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यापेक्षा उत्कृष्ट ओपनिंग जोडी सध्या तरी नाहीये. ही जोडी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासारखीच आहे, पण त्यांनी पुढेही ही जोडी कायम ठेवावी,' असं ट्वीट मायकल वॉनने केलं. या सीरिजमध्ये भारताने केएल राहुलला (KL Rahul) 4 मॅचमध्ये संधी दिली, पण तो सपशेल अपयशी ठरला. अखेर शेवटच्या टी-20 मध्ये राहुलला बाहेर बसवण्यात आलं. राहुलच्याऐवजी विराट कोहली ओपनिंगला बॅटिंगसाठी आला, तर फास्ट बॉलर टी.नटराजन याला टीममध्ये घेण्यात आलं. विराट कोहलीने या मॅचआधी टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये 7 वेळा ओपनिंग केली. ओपनर म्हणून विराटने 8 मॅचमध्ये 38.14 च्या सरासरीने 267 रन केले, यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Rohit sharma, T20 cricket, Virat kohli

    पुढील बातम्या