मुंबई, 28 फेब्रुवारी : टीम इंडियाला टेस्ट सीरिजनंतर इंग्लंडविरुद्ध (India vs England) पाच टी-20 मॅचची सीरिजही खेळायची आहे. या सीरिजची सुरूवात 12 मार्चपासून होणार आहे. या सीरिजसाठी भारतीय टीममध्ये मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती (Varun Chakrawarthy) याचीही निवड करण्यात आली आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजला वरुण मुकू शकतो, अशी बातमी आता समोर आली आहे. बीसीसीआयच्या नव्या फिटनेस टेस्टमध्ये वरुण चक्रवर्तीने चांगली कामगिरी केली नाही, ज्यामुळे वरुणला बाहेर बसावं लागू शकतं.
बीसीसीआयच्या नव्या फिटनेस टेस्टनुसार खेळाडूला 2 किमीची दौड 8.5 मिनीट आणि यो-यो टेस्टमध्ये कमीत कमी 17.1 चा स्कोअर आणणं अपेक्षित आहे. वरुणने मात्र आपल्याला बीसीसीआयने याबाबत काहीही सांगितलं नसल्याचं स्पष्टीकरण क्रिकबझशी बोलताना दिलं आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातूनही बाहेर
पाच महिन्यात दुसऱ्यांदा वरुण चक्रवर्ती भारतीय टीममधून बाहेर जाईल. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळीही (India vs Australia) वरुण टी-20 सीरिजमधून दुखापतीमुळे बाहेर झाला होता. आयपीएलच्या (IPL 2020) मागच्या मोसमात वरुणने कोलकात्याकडून (KKR) खेळताना धमाकेदार कामगिरी केली होती. यानंतर त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळालं होतं. दुखापतीनंतर त्याला एनसीएमध्येही पाठवण्यात आलं.
वरुण चक्रवर्ती सध्या कोलकाता नाईट रायडर्सच्या कॅम्पमध्ये सराव करत आहे. विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) साठी त्याला तामीळनाडूच्या टीममध्ये जागा मिळाली नाही. टी-20 स्पेशलिस्ट असल्यामुळे त्याला संधी दिली नसल्याचं कारण सांगण्यात आलं. वरुणने तामीळनाडूसाठी एक प्रथम श्रेणी मॅच तर 9 लिस्ट ए मॅच खेळल्या. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतही त्याला तामीळनाडूने संधी दिली नाही.