अहमदाबाद, 25 फेब्रुवारी : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या तिसऱ्या टेस्टचा निकाल दुसऱ्याच दिवशी लागला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या ऐतिहासिक मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेलं 49 रनचं आव्हान भारताने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. रोहित शर्मा 25 रनवर तर शुभमन गिल 15 रनवर नाबाद राहिले.
त्याआधी दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडचा फक्त 81 रनवर ऑल आऊट झाला. पहिल्या इनिंगमध्ये 6 विकेट घेणाऱ्या अक्षर पटेलने (Axar Patel) दुसऱ्या इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या, तर आर.अश्विनला (R.Ashwin) 4 विकेट मिळाल्या. वॉश्गिंटन सुंदरला एक विकेट घेण्यात यश आलं.
दुसऱ्या दिवसाची सुरूवात भारताने 99-3 अशी केली होती, पण 145 रनवरच भारताची इनिंग संपुष्टात आली. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये फक्त 33 रनची आघाडी मिळाली. दुसऱ्या दिवशी जो रुट (Joe Root) आणि जॅक लीच (Jack Leach) यांच्या माऱ्यापुढे भारताची इनिंग कोसळली. जो रुटनं फक्त 8 रन देऊन 5 विकेट्स घेतल्या.
अश्विनने इतिहास घडवला, हा विक्रम भारताचा पहिला तर जगातला दुसरा
रोहित शर्माने अहमदाबादच्या फिरत्या पिचवर 66 रनची महत्त्वपूर्ण खेळी केली. सुरुवातीपासून आत्मविश्वासनं खेळणाऱ्या रोहितचा लीचला खेळण्याचा प्रयत्न फसला आणि तो आऊट झाला.
अहमदाबादची ही टेस्ट जिंकल्यामुळे भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग आणखी सुकर झाला आहे. आता शेवटची टेस्ट ड्रॉ झाली तरी भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IND Vs ENG