IND vs ENG : 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर पहिल्यांदाच झाला टीम इंडियात हा बदल

IND vs ENG : 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर पहिल्यांदाच झाला टीम इंडियात हा बदल

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये (India vs England) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा टॉस हरला. या मॅचमध्ये टीम इंडियाने एक बदल केला. कुलदीप यादवच्याऐवजी (Kuldeep Yadav) भारताने डावखुरा फास्ट बॉलर टी.नटराजन (T Natrajan) याला संधी दिली. याचसोबत तब्बल 4 वर्षांनंतर टीम इंडियामध्ये एक बदल पाहायला मिळाला.

  • Share this:

पुणे, 28 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये (India vs England) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा टॉस हरला. यानंतर इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर (Jos Buttler) याने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. या मॅचमध्ये टीम इंडियाने एक बदल केला. कुलदीप यादवच्याऐवजी (Kuldeep Yadav) भारताने डावखुरा फास्ट बॉलर टी.नटराजन (T Natrajan) याला संधी दिली. याचसोबत तब्बल 4 वर्षांनंतर टीम इंडियामध्ये एक बदल पाहायला मिळाला.

2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर पहिल्यांदाच युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) हे दोघंही भारतीय टीममध्ये नाहीत. 2017 नंतर टीम इंडियाने 81 वनडे खेळल्या. या प्रत्येक सामन्यात कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल एकत्र खेळले किंवा त्यांच्यापैकी एकाला तरी संधी मिळाली. पण गेल्या काही दिवसांमध्ये या दोघांचा फॉर्म ढासळल्यामुळे विराटला हा निर्णय घ्यावा लागला.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला. यानंतर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि आर.अश्विन (R Ashwin) यांना भारताच्या वनडे टीममधून डच्चू मिळाला, त्यानंतर या दोघांच्या जागी कुलदीप आणि चहलची टीममध्ये वर्णी लागली. कुलदीप आणि चहलच्या या जोडीने टीम इंडियामध्ये पदार्पण करत धमाका केला. वनडे क्रिकेटच्या मधल्या ओव्हरमध्ये या जोडीने विरोधी टीमच्या खोऱ्याने विकेट घेतल्या. या विकेट घेण्यात खेळपट्टी मागून धोनीची मदत मिळत असल्याचं दोघांनी अनेकवेळा सांगितलं, पण आता धोनी निवृत्त झाल्यानंतर या दोघांचं करियरच धोक्यात आलं आहे. काही काळानंतर जडेजाचं भारताच्या वनडे टीममध्ये पुनरागमन झालं तरी अश्विनला मात्र अजूनही संधी मिळालेली नाही.

धोनीच्या निवृत्तीनंतर कुलदीप-चहलची सुमार कामगिरी

धोनीने (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर चहल आणि कुलदीप यांचा फॉर्म ढासळला आहे. धोनी टीममध्ये असताना कुलदीप यादवने 47 मॅचमध्ये 22.53 ची सरासरी आणि 27.8 च्या स्ट्राईक रेटने 91 विकेट घेतल्या. तर चहलने धोनी असताना 46 मॅचमध्ये 25.32 ची सरासरी आणि 30.7 च्या स्ट्राईक रेटने 81 विकेट घेण्यात यश मिळवलं.

धोनीच्या निवृत्तीनंतर मात्र या दोघांच्या कामगिरीने निच्चांक गाठला आहे. कुलदीपने धोनीच्या निवृत्तीनंतर खेळलेल्या 16 मॅचमध्ये 61.71 च्या सरासरीने आणि 9.6 च्या स्ट्राईक रेटने 14 विकेट घेतल्या, तर याच कालावधीमध्ये चहलने 8 मॅचमध्ये 41.82 च्या सरासरीने 36.9 च्या स्ट्राईक रेटने 11 विकेट मिळवल्या. धोनी टीममध्ये असताना कुलदीपचा इकोनॉमी रेट 4.87 होता, तर धोनीनंतर हीच आकडेवारी 6.22 झाली. दुसरीकडे चहलचा इकोनॉमी रेट धोनी असताना 4.95 तर धोनीच्या निवृत्तीनंतर 6.80 झाला.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये कुलदीपने 10 ओव्हर बॉलिंग करून 84 रन दिल्या, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. तर पहिल्या वनडेमध्ये त्याने 9 ओव्हर टाकून 68 रन दिल्या, तेव्हाही त्याला विकेट घेण्यात यश आलं नाही.

Published by: Shreyas
First published: March 28, 2021, 5:17 PM IST

ताज्या बातम्या