मुंबई, 19 जानेवारी : इंग्लंडविरुद्धच्या आगामी टेस्ट सीरिजसाठीच्या (India vs Australia) पहिल्या दोन मॅचसाठी भारतीय टीमची घोषणा आज होणार आहे. पितृत्वाच्या रजेनंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) चं टीममध्ये पुनरागमन होणार आहे. तर इशांत शर्मादेखील दुखापतीतून फिट झाल्यामुळे टीममध्ये परत येईल. बुमराह आणि अश्विन यांना दुखापत झाल्यामुळे दोघंही ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी टेस्ट खेळले नाहीत. या विश्रांतीमुळे तेदेखील फिट व्हायचा अंदाज आहे. 5 फेब्रुवारीपासून चेन्नईमध्ये पहिल्या टेस्ट मॅचला सुरूवात होणार आहे.
मोहम्मद शमी (हाताला फ्रॅक्चर), रविंद्र जडेजा (अंगठ्याला फ्रॅक्चर), उमेश यादव (मांडीच्या स्नायूला दुखापत), हनुमा विहारी (मांडीच्या स्नायूला दुखापत) निवडीसाठी उपलब्ध नसतील. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच इंग्लंडविरुद्धच्या सीरिजसाठी भारतीय टीमची निवड होणार आहे.
27 जानेवारीला बायो-बबलमध्ये प्रवेश
या टेस्ट सीरिजच्या पहिल्या दोन मॅच 5-9 फेब्रुवारी आणि 13-17 फेब्रुवारीदरम्यान चेन्नईमध्ये होणार आहेत. यासाठी भारतीय टीम 27 जानेवारीला बायो-बबलमध्ये प्रवेश करेल. पहिल्या दोन टेस्टसाठी 16-18 खेळाडूंची निवड होऊ शकते, तसंच काही नेट बॉलरनाही संधी दिली जाऊ शकते.
कोणत्या बॉलरना संधी?
दुखापतीनंतर इशांत शर्मा सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत तो चांगल्या लयीतही दिसत आहे. तसंच जसप्रीत बुमराहदेखील त्याच्यासोबत उपलब्ध असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांनाही संधी मिळेल, हे जवळपास निश्चित आहे. टी. नटराजन हा रिझर्व्ह बॉलर असेल. जडेजा खेळणार नसल्यामुळे वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम यांचा उपयोग केला जाऊ शकतो. शाहबाज नदीमने 2019 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक टेस्ट मॅच खेळली होती.
पंत आणि साहा विकेट कीपर
ऋषभ पंत आणि ऋद्धीमान साहा हे दोघं विकेट कीपर असतील, तसंच मयंक अगरवाल किंवा केएल राहुल यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. पृथ्वी शॉ याला डच्चू मिळेल, हे निश्चित मानलं जात आहे. आज संध्याकाळी 5 वाजता निवड समितीची बैठक होणार आहे.
इंग्लंड सीरिजविरुद्ध संभाव्य भारतीय टीम
ओपनर : शुभमन गिल, रोहित शर्मा, मयंक अगरवाल,
मधली फळी : चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे
विकेट कीपर : ऋद्धीमान साहा, ऋषभ पंत
ऑलराऊंडर : वॉशिंग्टन सुंदर
फास्ट बॉलर : जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, टी नटराजन
स्पिनर : आर.अश्विन, शाहबाज नदीम, कुलदीप यादव