पुणे, 24 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेआधी टीम इंडियाला (India vs England) मोठा धक्का बसला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) उरलेल्या दोन्ही वनडेमधून बाहेर झाला आहे. पहिल्या वनडेमध्ये फिल्डिंग करत असताना अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. इएनसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार श्रेयस अय्यरचा खांदा निखळला आहे, त्यामुळे तो अर्धी आयपीएल (IPL 2021) खेळू शकणार नाही. आयपीएलमध्ये अय्यर दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार आहे.
मैदानामध्ये दुखापत झाल्यानंतर श्रेयस अय्यरला लगेच रुग्णालयात स्कॅनिंगसाठी नेण्यात आलं. मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये फिल्डिंग करत असताना आठव्या ओव्हरमध्ये अय्यरने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. बॉल अडवताना उडी मारली तेव्हा तो खांद्यावर पडला आणि यातच त्याला दुखापत झाली.
बीसीसीआयने अजूनपर्यंत श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमधून बाहेर झाल्याचं अधिकृतपणे सांगितलं नाही. पण या दुखापतीतून बरं व्हायला त्याला काही आठवडे लागतील, त्यामुळे त्याचं आयपीएल खेळणंही कठीण झालं आहे.
इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमधून अय्यर बाहेर झाला तरी भारताकडे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) हे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करू शकतो. सध्या पंत दिल्लीचा उपकर्णधार आहे. पण अय्यरचं टीममध्ये नसणं हा दिल्लीसाठी मोठा धक्का असेल.
मागच्या सहा महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही अय्यरचा खांदा दुखावला होता. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आणि वनडे सीरिजमध्ये अय्यरचं टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं. भारतीय टीममध्ये परतण्याआधी श्रेयस अय्यर विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून 8 पैकी 4 मॅच खेळला होता, यात त्याने दोन शतकं केल होती.
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत इंग्लंडमधला काऊंटी क्लब लँकशायरसाठीही धक्का आहे. काहीच दिवसांपूर्वी लँकशायरने रॉयल लंडन कप (50 ओव्हर) साठी श्रेयस अय्यरसोबत करार केला होता.
आयपीएलच्या मागच्या मोसमात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीची टीम फायनलमध्ये पोहोचली होती, पण अंतिम सामन्यात मुंबईने त्यांचा पराभव केला होता. मागच्या मोसमात श्रेयस अय्यर सर्वाधिक रन करणारा चौथा तर दिल्लीचा दुसरा खेळाडू होता. अय्यरने आयपीएल 2020 मध्ये 519 रन केले. अय्यरपेक्षा केएल राहुल, शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी जास्त रन केले होते.
यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीचा पहिला सामना 10 एप्रिलला चेन्नईविरुद्ध मुंबईमध्ये होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, IPL 2021, Shreyas iyer