चेन्नई, 14 फेब्रुवारी : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये चेन्नईच्या खेळपट्टीने दुसऱ्याच दिवशी रंग दाखवायला सुरूवात केली आहे. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये तब्बल 8 विकेट गेल्या. यातल्या 4 विकेट भारताच्या तर 4 विकेट इंग्लंडच्या होत्या. दुसऱ्या दिवसाचा लंच झाला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर 39-4 एवढा झाला आहे. इंग्लंडची टीम अजूनही 290 रनने पिछाडीवर आहे. भारताकडून अश्विनने 2 तर अक्षर पटेल आणि इशांत शर्मा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
आजच्या दिवसाची सुरूवात भारताने 300-6 अशी केली होती. पण फक्त 29 रनवरच भारताच्या उरलेल्या 4 विकेट गेल्या. ऋषभ पंत 58 रनवर नाबाद राहिला. शुभमन गिल, विराट कोहली, इशांत शर्मा आणि कुलदीप यादव हे भारताचे चार बॅट्समन शून्य रनवर आऊट झाले. रोहित शर्माचं शतक तसंच अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंतच्या अर्धशतकामुळे भारताने 300 रनचा टप्पा ओलांडला. रोहित आणि अजिंक्य यांच्यात चौथ्या विकेटसाठी 310 बॉलमध्ये 162 रनची पार्टनरशीप झाली. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर ओली स्टोनला 3 विकेट, जॅक लीचला 2 आणि जो रूटला एक विकेट मिळाली.
या मॅचमध्ये विराटने टीममध्ये तीन बदल केले आहेत. शाहबाज नदीमऐवजी अक्षर पटेल, जसप्रीत बुमराहऐवजी मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदरऐवजी कुलदीप यादवला संधी दिली आहे.
याआधी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 227 रनने पराभव झाला होता. इंग्लंडचा भारतीय भूमीवरचा सगळ्यात मोठा विजय होता, तसंच भारताने 22 वर्षानंतर पहिल्यांदाच चेन्नईमध्ये टेस्ट मॅच गमावली. चार टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये आता इंग्लंड 1-0 ने पुढे आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (ICC World Test Championship Final) प्रवेश मिळवण्यासाठी आता भारताला फक्त दुसरी टेस्टच नाही, तर सीरिजही जिंकावी लागणार आहे. दुसऱ्या टेस्टमध्येही जर भारताचा पराभव झाला, तर विराटचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळण्याचं स्वप्न भंगेल. 18 ते 22 जूनदरम्यान लॉर्ड्सवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल. न्यूझीलंडची टीम आधीच या फायनलमध्ये पोहोचली आहे. आता भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी स्पर्धा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.