मुंबई, 6 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England) इनिंग आणि 25 रननी विजय झाला. याचसोबत भारताने 4 टेस्ट मॅचची ही सीरिज 3-1 ने जिंकली. हा विजय मिळवत टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (ICC World Test Championship Final) पोहोचली आहे. ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि अश्विन भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. भारताची अवस्था बिकट असताना ऋषभ पंतने शतकी खेळी केली, तर वॉशिंग्टन सुंदर 96 रनवर नाबाद राहिला. अक्षर पटेल आणि अश्विन यांनी प्रत्येकी 5-5 विकेट घेतल्या.
ऋषभ पंत (Rishbah Pant) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांच्यामध्ये सातव्या विकेटसाठी 113 रनची पार्टनरशीप झाली. ऋषभ पंतने त्याच्या 101 रनच्या खेळीमधल्या पहिल्या 50 रन 82 बॉल खेळून केल्या, तर पुढच्या 50 रनसाठी त्याने फक्त 33 बॉल घेतले. भारतातलं ऋषभ पंतचं हे पहिलं शतक तर टेस्ट करियरमधलं तिसरं शतक होतं. याआधी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्येही त्याने शतकं केली होती. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतकं करणारा ऋषभ पंत ऍडम गिलख्रिस्टनंतरचा जगातला दुसराच विकेट कीपर आहे.
ऋषभ पंतच्या या खेळीनंतर त्याचा आशिष नेहरा (Ashish Nehra) सोबतचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये नेहरा ऋषभ पंतला बॅटवर सही देत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) यानेही या फोटोबाबत ट्विट केलं आहे. याआधी आपण लहान विराट कोहली आणि आशिष नेहराचा फोटो बघितला होता. यशाची सिक्रेट रेसिपी काय आहे, हे आता तुमच्या लक्षात आलं असेल, असं ट्विट आकाश चोप्राने केलं.
ऋषभ पंतसाठी 2021 हे वर्ष उत्तम ठरत आहे. 6 इनिंगमध्ये त्याने 64.37 च्या सरासरीने 515 रन केले. यावर्षी सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पंतच्या पुढे फक्त इंग्लंडचा कर्णधार जो रूट आहे. जो रूटने यावर्षी 764 रन केले आहेत. ऋषभ पंतने यावर्षी भारतासाठी ऐतिहासिक खेळी केल्या. सिडनीमध्ये त्याने 97 रन, ब्रिस्बेनमध्ये नाबाद 89 रन, चेन्नईमध्ये 91 आणि त्यानंतर पुन्हा चेन्नईमध्येच नाबाद 58 रन केले. आता अहमदाबादमध्ये त्याने 101 रनची महत्त्वाची खेळी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Rishabh pant