अहमदाबाद, 16 मार्च : नुकत्याच भारत(India) आणि इंग्लंड (England) यांच्यामध्ये झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये भारतानं 3-1 ने विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार होता ऑलराउंडर क्रिकेटपटू अक्षर पटेल (Axar Patel). तीन सामन्यात त्याने 28 विकेट घेतल्या. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे इंग्लंडविरुद्धच्या टी-20 स्पर्धेच्या (T-20 Series) भारतीय संघातही (India Team) त्याची निवड झाली; पण पहिल्या सामन्यापासूनच त्याची कामगिरी ढेपाळत असल्याचं दिसत आहे. टेस्ट मॅचेसमध्ये दिसलेली त्याची चमक टी-20मध्ये फारच फिकी पडली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 च्या पहिल्या मॅचमध्ये अक्षर पटेलला तीन ओव्हर बॉलिंग देण्यात आली; पण त्यात त्यानं 24 रन दिल्या, मात्र एकही विकेट मिळाली नाही. आधीच्या टी-20 मॅचेसमधील त्याची कामगिरीही फार चांगली नाही. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील उर्वरीत 3 टी-20 मॅचेससाठी कॅप्टन विराट कोहली अक्षर पटेलला संधी देणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आतापर्यंत आपल्या आंतरराष्ट्रीय टी-20 च्या कारकिर्दीत अक्षर पटेलनं 12 मॅचे खेळल्या असून, त्यात एकूण 9 विकेट घेतल्या आहेत तर 75 रन केल्या आहेत. या आधीच्या टी-20 च्या तिन्ही मॅचेमध्ये त्यानं भारतीय संघासाठी फक्त 13 रन बनवल्या असून, एकही विकेट मिळवलेली नाही.
त्याचवेळी भारतीय संघातील ऑलराउंडर रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या आणि राहुल तेवतिया हे खेळाडू आयपीएल (IPL) आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं उत्तम कामगिरी करत आहेत. जडेजा आणि सुंदर हे तर आता भारतीय टी-20 संघाचे अविभाज्य घटक बनले आहेत. अक्षर पटेलची नाव मात्र बुडत असल्याचं दिसत आहे.
सातत्याने चांगली कामगिरी करत राहणं हे कुठल्याही खेळाडूसाठी कठीणच असतं आणि त्यात देशवासियांकडून अपेक्षा वाढत गेल्या की खेळाडूच्या मनावरील ताण वाढत जातो. कसोटीतील कामगिरीमुळे वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करताना अक्षरला खूप तणावाचा सामना करावा लागत असेल आणि त्याचा परिणाम त्याच्या खेळावर होत असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेस्ट आणि टी-20 हे प्रचंड भिन्न प्रकार आहेत. दोन्ही प्रकारांत खेळण्यासाठी वेगवेगळी मानसिकता असावी लागते. कसोटीत वेळ भरपूर असतो तर टी-20 मध्ये कमी वेळात कामगिरी करून दाखवायची असते. हा मानसिक बदल चटकन करणंही खेळाडूंना अवघड जातं. कदाचित अक्षरलाही तसाच त्रास होत असावा. पण तो आपली कामगिरी सुधारेल अशी अपेक्षा करूया.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Axar patel, Cricket news, India vs england, T20 cricket