मुंबई, 19 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs England) निवड झाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे सीरिजमध्ये असलेल्या 7 भारतीय खेळाडूंना या टीममधून डच्चू देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियात संजू सॅमसन (Sanju Samson) आणि मनिष पांडेला (Manish Pandey) वनडे सीरिज खेळण्याची संधी मिळाली नव्हती, यानंतर आता त्यांना इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये बाहेर बसवण्यात आलं आहे. ही सीरिज 23 मार्चपासून सुरू होणार आहे, सगळ्या मॅच पुण्यात खेळवल्या जातील. 23, 26 आणि 28 मार्चला हे सामने होतील.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडे सीरिजमध्ये असलेल्या मयंक अग्रवाल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मनिष पांडे, नवदीप सैनी, संजू सॅमसन आणि रविंद्र जडेजा यांना इंग्लंडविरुद्ध संधी मिळाली नाही. बुमराहने लग्नानिमित्त विश्रांती घेतली, तर मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा दुखापतीतून सावरलेले नाहीत. मयंक अग्रवालला ऑस्ट्रेलियात दोन मॅच खेळण्याची संधी मिळाली होती, पण त्याला खास कामगिरी करता आली नव्हती. दोन मॅचमध्ये 50 रन करून तो आऊट झाला. त्याचा सर्वोत्तम स्कोअर 28 रन होता.
तर फास्ट बॉलर नवदीप सैनीला फार प्रभाव टाकता आला नाही. 17 ओव्हरमध्ये त्याने 9 च्या इकोनॉमी रेटने 153 रन दिला आणि त्याला फक्त एक विकेट घेता आली. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्येही त्याला संधी मिळालेली नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे टीममध्ये नसलेला रोहित शर्मा, ऋषभ पंत याचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे, तर सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद सिराज यांनाही संधी देण्यात आली आहे.
हार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडे सीरिजमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. तीन वनडे मॅचच्या त्या सीरिजमध्ये भारताचा 2-1 ने पराभव झाला होता, पण हार्दिकने 3 मॅचमध्ये 105 च्या सरासरीने सर्वाधिक 210 रन केले होते, यात दोन अर्धशतकांचा समावेश होता.
इंग्लंडविरुद्ध भारतीय टीम
विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, वॉशिंगटन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england, Sports, Team india