लंडन, 17 ऑगस्ट : लॉर्ड्स टेस्टमध्ये भारताकडून 151 रनने पराभव झाल्यानंतर इंग्लंडची टीम (India vs England Lords Test) आणि त्यांचा कर्णधार जो रूटवर (Joe Root) प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. महान बॅट्समन सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) इंग्लंडची रणनिती आणि त्यांच्या बॅटिंगवर टीका केली आहे. भारतीय बॉलर्सचं आक्रमण पाहून इंग्लंडचे खेळाडू घाबरले आहेत. भारताच्या बॉलिंगसमोर इंग्लंडचे खेळाडू हैराण दिसत आहेत. फक्त जो रूटच शतक करण्यासाठी सक्षम वाटत आहेत, असंही सचिन म्हणाला.
'जो रूटने जेव्हा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला तेव्हा मी हैराण झालो. इंग्लंडची टीम भारताच्या फास्ट बॉलिंग आक्रमणाला घाबरली आहे, हेदेखील यावरून दिसून आलं. हवामानाने साथ दिली तर भारत ही टेस्ट मॅच जिंकेल, हे मी माझ्या मित्राला शुक्रवारी सकाळी 8 वाजता सांगितलं. भारताच्या ओपनरनाही याचं श्रेय मिळालं पाहिजे. पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी उत्कृष्ट बॅटिंग केली,' असं सचिन पीटीआयशी बोलताना म्हणाला.
'जो रूट वगळता कोणताही इंग्लंडचा खेळाडू नियमीत पणे शतकीय खेळी करताना दिसत नाही. एखाद्या मॅचमध्ये ते मोठा स्कोअर करतील, पण नेहमी असं होत नाही. आधी इंग्लंडच्या टीममध्ये एलिस्टर कूक, मायकल वॉन, केव्हिन पीटरसन, इयन बेल, जोनथन ट्रॉट, एन्ड्रयू स्ट्राऊस यांच्यासारखे खेळाडू होते. जे नियमीतपणे चांगले खेळायचे. कमजोर बॅटिंगमुळे रूटने पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला असेल,' अशी प्रतिक्रिया सचिनने दिली.
पहिल्या इनिंगमध्ये शतक करणारा रूट दुसऱ्या इनिंगमध्ये लवकर आऊट झाला, यानंतर इंग्लंडची बॅटिंग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. भारताने ठेवलेल्या 272 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा फक्त 120 रनवर ऑल आऊट झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Joe root, Sachin tendulkar