अहमदाबाद, 11 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला शुक्रवार 12 मार्चपासून सुरूवात होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या (T-20 World Cup) दृष्टीने ही सीरिज अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, त्यासाठी टीम संतुलित करण्याचं आव्हान विराट कोहली (Virat Kohli) पुढे आहे. या सीरिजमध्ये ओपनिंगला कोण खेळणार, याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL Rahul) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) हे तीन पर्याय भारतीय टीमकडे आहेत, पण रोहित शर्मा आणि केएल राहुल ओपनिंगला खेळतील, असं कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केलं आहे.
'केएल राहुल आणि रोहित शर्मा सातत्याने ओपनिंगला चांगली कामगिरी करत आहेत. या दोघांपैकी कोणी विश्रांती घेतली तर शिखर धवन तिसरा ओपनर आहे. त्यामुळे रोहित आणि राहुलच ओपनिंग करतील,' असं विराटने सांगितलं आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहितला दुखापत झालेली असताना राहुल आणि शिखर धवन ओपनिंगला खेळले होते, पण आता रोहित शर्माचं टीममध्ये आगमन झालं आहे. तसंच याआधी टी-20 आणि वनडेमध्ये राहुलवर विकेट कीपिंगची जबाबदारी होती. पण ऑस्ट्रेलिया आणि मग इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऋषभ पंतने धमाकेदार कामगिरी केली, त्यामुळे त्याला आता इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्येही संधी मिळण्याची शक्यता आहे. ऋषभ पंतला जर अंतिम-11 मध्ये खेळवण्यात आलं, तर केएल राहुलवरची विकेट कीपिंगची जबाबदारी कमी होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kl rahul, Rohit sharma, Shikhar dhawan, Team india, Virat kohli