IND vs ENG : भारतात यश मिळवण्यासाठी पीटरसनने इंग्लंडच्या बॅट्समनना सांगितला द्रविडचा 'मंत्र'
भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्याविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी केव्हिन पीटरसनने (Kevin Pietersen) स्पिन बॉलिंग कशी खेळायची, याचा राहुल द्रविडने (Rahul Dravid) दिलेला मंत्र इंग्लंडच्या बॅट्समननाही सांगितला आहे.
मुंबई, 24 जानेवारी : टीम इंडियाची भिंत म्हणून ओळख मिळवलेल्या राहुल द्रविड (Rahul Dravid) ने आपल्या कारकिर्दीत दिग्गज फास्ट बॉलर आणि स्पिनर्ससमोर कायमच किल्ला लढवला. खेळपट्टी उसळी मारणारी असो किंवा स्पिनरना मदत करणारी, राहुल द्रविड सारखी बॅटिंग कोणताही दुसरा खेळाडू करू शकला नाही. स्पिनर्सविरुद्ध चांगली बॅटिंग करण्यासाठी दिग्गज बॅट्समनही राहुल द्रविडसारख्या तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न करतात.
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen) याने शनिवारी इंग्लंडचे बॅट्समन डोम सिब्ली आणि जॅक क्रॉले यांच्यासाठी खास मेसेज दिला. हे दोन्ही बॅट्समन श्रीलंकेच्या स्पिनरर्सविरुद्ध लागोपाठ 3 वेळा आऊट झाले आहेत. यानंतर पीटरसनने सोशल मीडियावर स्पिनर्सविरुद्ध खेळण्याची पद्धत सांगितली आहे. पीटरसनला ही पद्धत खुद्द राहुल द्रविडने सांगितली होती.
Hey @englandcricket, print this and give it to Sibley & Crawley.
They can call me to discuss it at length if they want...!
केव्हिन पीटरसनने खेळत असताना राहुल द्रविडकडून स्पिनर्सविरुद्ध कसं खेळायचं, याबाबतचा सल्ला मागितला होता. यानंतर राहुल द्रविडने एक ई-मेल करून स्पिनर्सना खेळण्याबाबत पीटरसनला टीप्स दिल्या होत्या. पीटरसनने त्याच्या आत्मचरित्रात द्रविडने स्पिनर्सविरुद्ध असलेली कमजोरी कशी दूर केली, हे लिहिलं आहे.
काय म्हणाला राहुल द्रविड?
'नेटमध्ये स्पिन बॉलरच्या हतातून बॉल सुटताना लेन्थ बघण्याचा प्रयत्न कर. ग्रॅम स्वान आणि मॉन्टी पनेसार याच्याविरुद्ध पॅड न बांधता बॅटिंग कर, ज्यामुळे तुला शरिरापेक्षा बॉलच्या लेन्थजवळ जाता येईल,' असं द्रविडने पीटरसनला सांगितलं. द्रविडच्या या सल्ल्याचा पीटरसनला फायदाही झाला.
डोम सिब्ले आणि जॅक क्रॉले या दोघांना श्रीलंकेचा स्पिनर एंबुलडेनियाने तीनवेळा आऊट केलं आहे. या दोन्ही खेळाडूंना आता भारत दौऱ्यावर (India vs England) यायचं आहे, त्यामुळे पीटरसनने दोघांना स्पिनर्सविरुद्ध खेळण्याचा द्रविडचा मंत्र सांगितला आहे.