अहमदाबाद, 11 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या टी-20 सीरिजला 12 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या मॅचआधी टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने दिलासादायक बातमी दिली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बॉलिंगपासून लांब असलेला हार्दिक पांड्या (Hardik Pandya) इंग्लंडविरुद्ध ऑल राऊंडर म्हणून मैदानात उतरणार आहे, असं रोहितने सांगितलं. 'टी-20 सीरिजमध्ये हार्दिक बॉलिंग करेल, टीमलाही त्याच्याकडून अपेक्षा आहे. पाठीच्या ऑपरेशननंतर हार्दिक बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी करेल आणि टीमसाठी मोलाचं योगदान देईल,' असा विश्वास रोहितने व्यक्त केला.
ऑक्टोबर 2019 साली हार्दिक पांड्याच्या पाठीचं ऑपरेशन झालं होतं. यानंतर मागच्या वर्षी आयपीएलमध्येही पांड्याने बॉलिंग केली नव्हती. ऑस्ट्रेलियात त्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावर टीमला मॅच जिंकवून दिली. तीन वनडे आणि तीन टी-20 मध्ये त्याने फक्त एकदाच बॉलिंग केली. तसंच इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्येही तो भारतीय टीममध्ये होता, त्यामुळे हार्दिकला मर्यादित ओव्हरच्या सीरिजसाठी तयार व्हायला मदत मिळाली, अशी प्रतिक्रिया रोहितने दिली.
'हार्दिक भारतीय टीमचा महत्त्वाचा घटक आहे. तो बॉलिंग आणि बॅटिंगवर काम करत आहे. टी-20 आणि वनडे सीरिजला तयार होण्यासाठी त्याने टीमसोबत चांगला वेळ घालवला आहे. पांड्याने स्वत:कडून सगळे प्रयत्न केले, त्यामुळे तो आता सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला तयार आहे. मागच्या काही आठवड्यांमध्ये त्याने बॅटिंग आणि बॉलिंगवर मेहनत घेतली आहे,' असं रोहित म्हणाला.
दुसरीकडे टेस्ट क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला ऋषभ पंत टी-20 टीममध्ये पुनरागमन करत आहे. या फॉरमॅटमध्येही पंत उत्कृष्ठ कामगिरी करेल, असा विश्वास रोहितने व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Hardik pandya, India vs england, Rohit sharma, Sports, Virat kohli