पुणे, 24 मार्च : इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर टीम इंडियाचे पांड्या बंधू माध्यमांमध्ये झळकले. सामना झाल्यानंतर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) या भावांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या फोटोने प्रत्येकालाच भावुक केलं. या फोटोत दोघं भाऊ एकमेकांना मिठी मारून रडताना दिसत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून कृणालने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच सामन्यात त्याने सर्वात जलद अर्धशतक फटकावलं.
अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर लगेचच कृणालने आपल्या डोक्यावर बुक्का मारला आणि बॅट आकाशाच्या दिशेने उंचावली. अलीकडेच निधन झालेले आपले वडील हिमांशू पंड्या (Himanshu Pandya) यांचं स्मरण त्याने केलं. त्याच वेळी डगआउटमध्ये बसलेला हार्दिक पांड्या आपल्या मोठ्या भावाची बॅटिंग पाहून भावुक झाला आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याच्यासोबत बसलेल्या सूर्यकुमार यादवने (Suyakumar Yadav) हार्दिकला सांभाळलं.
This is all heart A teary moment for ODI debutant @krunalpandya24 post his brilliant quick-fire half-century@hardikpandya7 #TeamIndia #INDvENG @Paytm pic.twitter.com/w3x8pj18CD
— BCCI (@BCCI) March 23, 2021
अर्धशतकाची खेळी खेळल्यानंतर कृणाल पांड्या मैदानावर ढाय मोकळून रडला. या घटनेचा व्हिडिओही बीसीसीआयने (BCCI)शेअर केला. त्या दिवशी मैदानावर उतरण्याच्या आधीपासूनच हे दोघे बंधू भावुक झाले होते. सामन्याच्या आधी आपल्या वडिलांच्या तीन वस्तू घेऊन ते ड्रेसिंग रूममध्येगेले होते, जेणेकरून आपल्या वडिलांचं अस्तित्व प्रत्येक क्षणी जाणवू शकेल. वडिलांची टोपी, बूट आणि कपडे या तीन वस्तू पांड्या बंधू ड्रेसिंग रूममध्येघेऊन गेले होते.
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचे वडील आणि साहित्यिक प्रा. रमेश तेंडुलकर यांचं निधन 1999 वर्ल्ड कप सुरू असताना झालं होतं. त्या वेळी सचिन तेंडुलकरअंत्यसंस्कारांसाठी घरी आला होता. त्यानंतर पुन्हा तातडीने तो स्पर्धेत रुजू झाला आणि लगेचच्याच सामन्यात शतक झळकावून,त्याने आकाशाकडे पाहून वडिलांना श्रद्धांजली वाहिली होती. तो क्षण प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या आणि सचिनच्या प्रत्येक चाहत्याच्या मनावर ठसलेला आहे. त्या क्षणाची आठवण सर्वांना पांड्या बंधूंच्या कृतीनंतर झाली असावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.