IND vs ENG : पंतच्या धमाकेदार शतकाला सुंदरची साथ, भारताकडे मोठी आघाडी

IND vs ENG : पंतच्या धमाकेदार शतकाला सुंदरची साथ, भारताकडे मोठी आघाडी

ऋषभ पंतचं (Rishabh Pant) शतक तर वॉशिंग्टन सुंदरच्या (Washington Sundar) नाबाद अर्धशतकामुळे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारत (India vs England) मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 5 मार्च : ऋषभ पंतचं (Rishabh Pant) शतक तर वॉशिंग्टन सुंदरच्या (Washington Sundar) नाबाद अर्धशतकामुळे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारत (India vs England) मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 294-7 एवढा झाला आहे. वॉशिंग्टन सुंदर 60 रनवर तर अक्षर पटेल (Axar Patel) 11 रनवर खेळत आहे. भारताकडे आता 89 रनची आघाडी आहे.

ऋषभ पंतचं टेस्ट क्रिकेटमधलं तिसरं तर भारतातलं पहिलंच शतक आहे. याआधी त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतकी खेळी केल्या होत्या. इंग्लंडच्या टीमचा पहिल्या इनिंगमध्ये 205 रनवर ऑल आऊट केल्यानंतर भारताची सुरूवात अत्यंत खराब झाली होती, पण ऋषभ पंतने वॉशिंग्टन सुंदरच्या मदतीने भारताला सावरलं.

118 बॉलमध्ये 101 रन करून पंत आऊट झाला. त्याच्या या खेळीमध्ये 13 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यामध्ये सातव्या विकेटसाठी 113 रनची पार्टनरशीप झाली. जेम्स अँडरसनने ऋषभ पंतला माघारी धाडलं.

शून्य रनवरच शुभमन गिल आऊट झाल्यानंतर रोहित शर्माने भारताचा किल्ला लढवला, पण दुसऱ्या बाजूने मात्र भारताच्या विकेट जातच होत्या. पुजारा 17 रनवर तर विराट कोहली शून्य रनवर आऊट झाला. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने 27 रन केले. यानंतर रोहित शर्मा मोठी खेळी करेल असं वाटत असतानाच स्टोक्सने 49 रनवर त्याला एलबीडब्ल्यू केलं. यानंतर पंत आणि सुंदरने भारताची पडझड होऊन दिली नाही. तसंच भारताची आघाडी 50 रनच्या पुढे पोहोचवली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलच्या दृष्टीने ही मॅच भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. फायनलला पोहोचण्यासाठी भारताला ही मॅच ड्रॉ किंवा जिंकावी लागेल. या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला, तर ऑस्ट्रेलियाची टीम फायनलमध्ये प्रवेश करेल. इंग्लंडची टीम या स्पर्धेतून आधीच बाहेर झाली आहे, तर न्यूझीलंडच्या टीमचा फायनलमध्ये प्रवेश झाला आहे.

Published by: Shreyas
First published: March 5, 2021, 4:36 PM IST

ताज्या बातम्या