मुंबई, 26 जानेवारी : टीम इंडियाने टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) त्यांच्याच मायभूमीत 2-1 ने पराभव केला, त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास बळावला आहे. पण आता भारतीय खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) आगामी सीरिजवर लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे. 5 फेब्रुवारीपासून या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरूवात होत आहे. एकीकडे भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलेलं असताना इंग्लंडनेही श्रीलंकेचा 2-0ने पराभव केला आहे, त्यामुळे या दोन्ही टीममध्ये रोमांचक सीरिज होण्याची अपेक्षा आहे.
इंग्लंडच्या टीममध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे एकहाती मॅच फिरवू शकतात. जो रूट, जॉस बटलर, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर ही इंग्लंडच्या टीममधली प्रमुख नावं आहेत. पण इंग्लंडकडे असलेले दोन स्पिनरही सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत.
इंग्लंडच्या टीममध्ये असलेले ऑफ स्पिनर डॉम बेस (Dom Base) आणि डावखुरा स्पिनर जॅक लीच (Jack Leach) भारतीय खेळपट्टीवर कमाल करू शकतात. श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडला मिळालेल्या मोठ्या विजयात या दोघांची भूमिका महत्त्वाची होती. डॉम बेसने श्रीलंकेविरुद्धच्या 2 टेस्टमध्ये 12 विकेट आणि जॅक लीचने 10 विकेट घेतल्या. श्रीलंकेच्या 40 पैकी 22 विकेट या दोघांनीच मिळवल्या. भारतीय खेळपट्ट्याही श्रीलंकेप्रमाणेच स्पिनरना अनुकूल असल्यामुळे लीच आणि बेस याचा फायदा घेऊ शकतात.
डॉम बेस याने 12 टेस्टमध्ये 31 विकेट घेतल्या आहेत, तर जॅक लिचही अनुभवी आहे. लिचने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 303 विकेट घेतल्या आहेत, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 टेस्ट खेळणाऱ्या लिचला 44 विकेट मिळाल्या आहेत.
भारतीय खेळाडू स्पिन बॉलिंग चांगली खेळत असले तरी 2012-13 साली इंग्लंडने भारतात टेस्ट सीरिज 2-1 ने जिंकली होती. या विजयात त्यांच्या स्पिनरची भूमिका महत्त्वाची होती. ग्रॅम स्वान आणि मॉन्टी पनेसार हे दोन स्पिनर भारतात यशस्वी ठरले. स्वानने 4 टेस्टमध्ये 20 विकेट तर पनेसारने 3 टेस्टमध्ये 17 विकेट घेतल्या होत्या. या सीरिजनंतर इंग्लंड 2016 साली पुन्हा भारतात आली होती, त्यावेळी टीम इंडियाचा 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 4-0ने विजय झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.